संग्रामपूर : मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे जळगाव जामोद शहरासह १४० गावांचा पाणीपुरवठा सलग तीन दिवस बंद राहणार आहे. दि. २६ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मुख्य गुरुत्ववाहिनी आणि एअर व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने नागरिकांनी पाण्याचे नियोजन करून आवश्यक साठा करून ठेवावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी इंदल राठोड यांनी केले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग जळगाव जामोद यांच्याकडून दि. २३ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात पत्र जारी करण्यात आले आहे. दैनंदिन देखभाल व दुरुस्तीअंतर्गत मुख्य गुरुत्ववाहिनीची दुरुस्ती तसेच एअर व्हॉल्व्ह दुरुस्ती करण्यात येणार असल्याने निर्धारित कालावधीत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा
पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार असल्याने नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठी आवश्यक पाणीसाठा आधीच करून ठेवावा. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून संभाव्य गैरसोय टाळावी. संबंधित ग्रामपंचायतींनीही गावातील नागरिकांपर्यंत ही सूचना पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या