प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : दुष्काळजन्य परिस्थितीमुळे तासगाव तालुक्यात निर्माण झालेल्या सिंचनाच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ताकारी व आरफळ सिंचन योजनांचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला जलसंपदा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.सातारा जिल्ह्यातील तांत्रिक अडचणी दूर करून योजनांचा विसर्ग वाढविण्यात आला असून आरफळ कालव्यातील गाळसफाईलाही गती देण्यात आली आहे. त्यामुळे कालव्याची वहनक्षमता वाढून पाणी तासगाव तालुक्याच्या पुढील भागापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील सुमारे ८ हजार ९७५ हेक्टर, तर आरफळ योजनेच्या लाभक्षेत्रातील सुमारे ११ हजार ९५९ हेक्टर शेतीला याचा फायदा होणार आहे. द्राक्ष हंगाम तोंडावर असल्याने वाढलेला विसर्ग शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.आरफळ कालव्यातून टेंभू अंतर्गत विसापूर-पुणदी योजनेसाठीही पाणी घेतले जाते. त्यामुळे या प्रवाहाचा फायदा पुढे पुणदी योजनेलाही होणार आहे. वाढविलेला विसर्ग तासगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रभावीपणे पोहोचतो का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या