सांगली प्रतिनिधी : महिलांच्या आरोग्याचा विषय म्हटला की गंभीर व्याख्यान, वैद्यकीय संज्ञा आणि सल्ले असे नेहमीचे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, गप्पा, गाणी, गोष्टी, व्हिडिओ, चित्रपटांतील प्रसंग आणि मनमोकळ्या संवादातून महिलांच्या आरोग्याचा जागर घडवून आणणारा ‘डॉक्टर अनिल मडके बोलतोय’ हा अनोखा कार्यक्रम भावे नाट्य मंदिरात रंगला आणि उपस्थित महिलांना आरोग्य प्रबोधना सोबतच मनोरंजनाचीही मेजवानी मिळाली.
राजमती महिला मंडळ, नेमिनाथ नगर, सांगली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रायोजक स्वदेशी ट्रस्ट होते रावसाहेब पाटील स्वदेशी ट्रस्टच्या वतीने सौ. कांचन रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम प्रायोजित करण्यात आला होता. नेमिनाथ जैन मंदिराचे ट्रस्टी आणि गोमटेश ग्रुप यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ज्येष्ठ छातीरोग तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि जनजागृतीपर उपक्रमांसाठी परिचित असलेले डॉ. अनिल मडके यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर अत्यंत सहज, मिश्कील आणि प्रभावी शैलीत संवाद साधला. आरोग्याच्या गंभीर विषयांना हलक्याफुलक्या शैलीत मांडताना त्यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे, लोकप्रिय चित्रपटांतील गाणी व प्रसंग, व्हिडिओ आणि किस्से यांचा सुरेख वापर केला.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, शरीर देत असलेल्या संकेतांकडे वेळीच लक्ष द्यावे आणि आजार होण्यापूर्वीच आरोग्याबाबत जागरूक व्हावे, असा महत्त्वपूर्ण संदेश डॉ. मडके यांनी दिला. त्यांच्या संवादात्मक शैलीमुळे कार्यक्रम केवळ व्याख्यान न राहता एक जिवंत संवादाचा अनुभव ठरला. अनेक प्रसंगी हास्याचे फवारे उडत असतानाच गंभीर आरोग्यविषयक संदेशही तितक्याच प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचला.
या कार्यक्रमाला राजमती महिला मंडळाच्या सुमारे 300 सभासदांसह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. दत्तनगर जैन मंदिर, पार्श्व पद्मावती जैन मंदिर, गावभाग जैन मंदिर, वखार भाग जैन मंदिर तसेच ब्रह्मनाळ, नांद्रे, समडोळी, नेज, धामणी, अर्जुनवाड, आष्टा, इचलकरंजी आदी परिसरातूनही प्रेक्षक कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष सौ स्मिता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सचिव सौ. अंजना मगदूम यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष सौ. वर्षा चौगुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजमती महिला मंडळाच्या कार्यकारिणीतील सहसचिव सौ. स्वाती मुरा बट्टे, खजिनदार सौ संयोगिता भोरे सह खजिनदार सौ. ज्योती पाटील, सहसचिव डॉ. प्रांजली मेहता संचालक सौ. प्रियांका उपाध्ये, यांनी विशेष परिश्रम घेतले.
महिलांच्या आरोग्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला प्रबोधन, मनोरंजन आणि संवादाची सुंदर जोड देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. राजमती महिला मंडळाच्या सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांच्या वाटचालीतील हा कार्यक्रम एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या