प्रतिष्ठा न्यूज / दिपक शिंत्रे
विजयपूर : सर्व संचालक मंडळ, सभासद, ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे श्री महालक्ष्मी सहकारी बँकेने 2025-26 या आर्थिक वर्षात 36.57 लाख रुपये निव्वळ नफा मिळविला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मुुकुंद कुलकर्णी यांनी दिली.
विजयपूर येथील श्री संगनबसव मंगल कार्यालयात रविवारी आयोजित श्री महालक्ष्मी सहकारी बँक लिमिटेडच्या 96 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कुलकर्णी म्हणाले, बँकेने प्रत्यक्षात 58.32 लाख रुपये नफा कमावला. त्यापैकी 10.55 लाख रुपये आयकर भरण्यात आले, तर 1.20 लाख रुपये अनुत्पादित मालमत्तेसाठी (NPA) वर्ग करण्यात आले. त्यानंतर बँकेला 36.57 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला.
बँकेची आर्थिक स्थिती भक्कम
2025-26 वर्षअखेर बँकेचे भागभांडवल 315.90 लाख रुपये असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात 23.39 लाख रुपयांची वाढ झाली आहे. राखीव निधी 485.91 लाख रुपये असून त्यातही मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे.
बँकेच्या एकूण ठेवी 9899.27 लाख रुपये झाल्या असून, मागील वर्षाच्या तुलनेत 699.08 लाख रुपयांची वाढ झाली आहे. सन 2026 मध्ये सभासदांना 5617.16 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
सभासदांनी घेतलेल्या कर्जाची नियमितपणे निश्चित हप्त्यांमध्ये व्याजासह वेळेत परतफेड करावी, असे आवाहनही अध्यक्ष कुलकर्णी यांनी केले.
2025-26 वर्षात बँकेचा निव्वळ NPA 2.74 टक्के असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात 0.66 टक्क्यांची घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
जलनगर येथे लवकरच नवीन शाखा
विजयपूर शहरातील जलनगर भागात बँकेची नवीन शाखा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही अध्यक्ष कुलकर्णी यांनी केली.
यावेळी SSLC व PUC परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या सभासदांच्या पाल्यांना प्रतिभा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सभेला बँकेचे उपाध्यक्ष विकास पदकी, संचालक विजय जोशी, कृष्णा गुन्नाळकर, गोविंद जोशी, श्यामसुंदर बी. कुलकर्णी, पवनकुमार कुलकर्णी, विनायक पत्तार, सचिन मद्दिनमठ, पवन मुराळ, विश्वनाथ तळवार, वीणा टंकसाळी, राधा तावरगेरी, समीर कुलकर्णी, अशोक उपाध्याय, श्रीमती पी. व्ही. कुलकर्णी, सहायक व्यवस्थापक के. बी. संगम, कृष्णा जोशी आदी उपस्थित होते.
भाग्यज्योती आयगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर नरसिंह जोशी यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या