विजयपूर : शहरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून, गोलघुमट परिसरातील जाडर ओणीत प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेश मंडपात घुसून चांदीचे दागिने चोरण्याचा चौघा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, मंडपाजवळील कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे चोरट्यांना पळ काढावा लागला.
जाडर ओणीतील गणेशमूर्तीला भाविकांनी अर्ध्या किलोहून अधिक वजनाचे आणि अंदाजे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे चांदीचे हार, सर, हातकवच, सोंड कवच तसेच चांदीचे कान घालून सजविले होते. रात्रीची पूजा झाल्यानंतर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडपाला पडदा लावून घरी गेले होते.
याचाच फायदा घेत चौघा चोरट्यांच्या टोळीने मध्यरात्री मंडपात प्रवेश केला. पडदा बाजूला करून त्यांनी गणेशमूर्तीच्या अंगावरील चांदीचे दागिने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंडपाजवळ असलेल्या कुत्र्यांनी चोरट्यांना पाहून जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली.
कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकून स्थानिक महिला जागी झाली. तिने बाहेर येऊन पाहिले असता चोरट्यांचा प्रकार तिच्या लक्षात आला. महिलेने आरडाओरड केल्याने घाबरलेल्या चोरट्यांनी दागिने तेथेच सोडून पळ काढला. चोरीचा प्रयत्न आणि चोरट्यांचे पळून जाण्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
या घटनेनंतर विजयपूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी भाविकांकडून गणेशमूर्तीला लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले जातात. मात्र, रात्रीच्या वेळी मंडपांना पुरेशी सुरक्षा नसल्यास चोरीच्या घटना घडण्याची शक्यता असल्याची चिंता गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पोलिस विभागाने तातडीने उपाययोजना करून शहरातील प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडपाबाहेर रात्रीच्या वेळी किमान एका होमगार्ड कर्मचाऱ्याची नियुक्ती करून सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या