सांगली, दि. ९ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षांखालील युवा बुद्धिबळपटूंना राष्ट्रीय पातळीवर झेप घेण्याची संधी देणारी महाराष्ट्र राज्य १५ वर्षांखालील खुली व मुलींची स्वतंत्र निवड फिडे रेटिंग अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा २०२६ सांगलीत आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान स्फूर्ती चौक येथील रेशीमगाठी सांस्कृतिक हॉल, सांगली येथे होणार आहे.
जी. एच. रायसोनी नागपूर व कल्पना फाउंडेशन नागपूर यांच्या पुरस्कृत तसेच सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एच२ई पॉवर सिस्टिम यांच्या प्रस्तुततेत ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष व चितळे उद्योग समूहाचे प्रमुख गिरीश चितळे, सचिव चंद्रकांत वळवडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेले खेळाडू तसेच १ जानेवारी २०११ नंतर जन्मलेले १५ वर्षांखालील मुले व मुली सहभागी होऊ शकतात. राज्यभरातून २०० हून अधिक खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी आठ खेळाडूंची निवड
या स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणजे चार मुले आणि चार मुली अशा एकूण आठ खेळाडूंची तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. हे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
स्पर्धा फिडेच्या स्विस सिस्टिमनुसार होणार असून एकूण आठ फेऱ्या खेळवल्या जातील. प्रत्येक डावासाठी ६० मिनिटे व प्रत्येक चालीसाठी ३० सेकंद बोनस अशी वेळ प्रणाली राहणार आहे. शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी तीन, शनिवार १२ सप्टेंबर रोजी तीन आणि रविवार १३ सप्टेंबर रोजी दोन फेऱ्या होतील. रविवार सायंकाळी ४.३० वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
या स्पर्धेमुळे १५ वर्षांखालील खेळाडूंना फिडेचे क्लासिकल आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळविण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेत एकूण ४८ हजार रुपयांची रोख पारितोषिके, तसेच खुल्या व मुलींच्या स्वतंत्र गटासाठी विविध पारितोषिके आणि ट्रॉफी देण्यात येणार आहेत. सहभागी खेळाडूंना फिडेकडून प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पंचांची नियुक्ती
स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी (रत्नागिरी) काम पाहणार आहेत. त्यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर (सांगली), राष्ट्रीय पंच करण परीट (इचलकरंजी), विजयकुमार माने (सांगली), यश लोहाना (कराड), रोहित पोळ (इचलकरंजी) तसेच राज्य पंच नाझिया पटेल (मिरज) आणि अनिता भोसले (जांभळी) पंच म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
सांगलीत होणाऱ्या या फिडे मानांकन निवड बुद्धिबळ स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवावे तसेच राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेत निवड होण्याची संधी साधावी, असे आवाहन स्पर्धा संयोजक गिरीश चितळे आणि सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव चंद्रकांत वळवडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी :
चंद्रकांत वळवडे, सचिव, सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटना
मो. ९९७५९५९०५५
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या