सांगली प्रतिनिधी : सार्वजनिक कार्यक्रम आणि मिरवणुकांमध्ये होणारे तीव्र ध्वनीप्रदूषण तसेच डोळ्यांना घातक ठरणारे लेझर लाईट्स यांवर कायदेशीर निर्बंध आणून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) सांगली शाखेच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन देण्यात आले.
नागरिकांच्या आरोग्य, शांतता आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने या विषयाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सण आणि उत्सव साजरे करण्याचा हक्क प्रत्येकाला असला तरी त्यामुळे इतरांच्या आरोग्याला बाधा पोहोचता कामा नये, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. सद्यस्थितीत मिरवणुकींमध्ये डीजे आणि उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा होणारा अमर्याद वापर आरोग्यासाठी गंभीर धोका ठरत आहे. तसेच, बीआयएस (BIS) मानकांचे उल्लंघन करून वापरल्या जाणाऱ्या लेझर लाईट्समुळे नागरिकांच्या डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
ध्वनी प्रदूषण नियम २००० नुसार निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या आयोजकांवर व ध्वनीवर्धक पुरवठादारांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी.
बीआयएस कायदा २०१६ नुसार परवान्याशिवाय साऊंड आणि लेझर सिस्टीमची विक्री, जोडणी व उत्पादन करणाऱ्यांवर जप्ती आणि फौजदारी कारवाई करण्यात यावी.
निवेदनावर अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, डॉ.सविता अक्कोळे, राहुल थोरात, जगदीश काबरे, आशा धनाले,त्रिशला शहा, अमर खोत, वासुदेव गुरव, सुखदेव पावशे, अमित ठकार,दिगंबर कांबळे, कोडींबा कांबळे,शोभा मधाळे, चंद्रकांत वंजाळे, अविनाश कांबळे यांच्या सह्या आहेत.
------
डीजेच्या बळी ठरलेल्या शीतल पावशे यांच्या नातेवाईकांची उपस्थिती:
हे निवेदन देताना कवठेएकंद (जि. सांगली) येथील डीजेच्या तीव्र आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन प्राण गमावलेले कै. शीतल पावशे यांचे वडील सुखदेव पावशे उपस्थित होते.
"ध्वनीप्रदूषणामुळे आमच्या कुटुंबावर ओढवलेला प्रसंग इतर कोणावरही येऊ नये; डीजे आणि डॉल्बीसारख्या प्राणघातक यंत्रणांवर प्रशासनाने तात्काळ पूर्ण बंदी घालावी," अशी अत्यंत भावनिक व कळकळीची विनंती सुखदेव पावशे यांच्या कुटुंबीयांनी या वेळी केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या