प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील श्री भवानी माता मंदिरातील गाभाऱ्यातून चांदीचे दागिने आणि पितळी समई चोरीला गेल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावत सराईत चोराला अटक केली.आरोपीकडून चोरीतील चांदीचे दागिने तसेच चोरीच्या गुन्ह्यातील दुचाकी असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि.१ जुलै रोजी सायंकाळी ६ ते २ जुलै रोजी सकाळी ६ या कालावधीत सावर्डे येथील श्री भवानी माता मंदिराच्या गाभाऱ्यातून देवीच्या अंगावरील सुमारे २५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच पितळी समई अज्ञात चोरट्याने लंपास केली होती.या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली होती.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली.सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह अमरसिंह सूर्यवंशी,सुरेश भोसले, संतोष माळी,सूरज जगदाळे, विवेक यादव, निलेश डोंगरे आणि शहाजी भोसले यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.तपासादरम्यान गुप्त बातमीदारा मार्फत प्रतिक उर्फ दगडू दादसो चव्हाण (रा. सावळज) याने ही चोरी केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी ३ जुलै रोजी देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथून आरोपीला ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान आरोपीने मंदिर चोरीची कबुली दिली.आरोपीने सावळज येथून प्रथम एक मोटारसायकल चोरी करून त्याच दुचाकीवरून सावर्डे येथे जाऊन भवानी माता मंदिरातील चांदीचे दागिने आणि पितळी समई चोरल्याची माहिती दिली.आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी चोरीतील २३ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त केले.तसेच चोरीस वापरलेली ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल देखील हस्तगत करण्यात आली.तपासात ही मोटारसायकल तासगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचेही निष्पन्न झाले.त्यामुळे मंदिर चोरीसह मोटारसायकल चोरी असे दोन्ही गुन्हे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.या धडाकेबाज कारवाईमुळे तासगाव पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत असून,मंदिर चोरीचा गुन्हा वेगाने उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या