प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा, दि. २० : नियतीच्या खेळापुढे माणूस किती हतबल असतो, याची प्रचिती देणारी अत्यंत हृदयद्रावक घटना गगनबावडा तालुक्यातील सांगशी व जांभुळणेवाडी परिसरात घडली आहे. एका मित्राच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकून घटनास्थळी धाव घेणाऱ्या दुसऱ्या मित्रालाच काळाने आपल्या विळख्यात ओढल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. काही तासांच्या अंतराने दोन मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने दोन्ही गावांवर दुःखाची छाया पसरली आहे.
घटनाक्रमाची सुरुवात सांगशी येथील रहिवासी संतोष चव्हाण यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने झाली. क्रिकेट क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने ओळख निर्माण केलेले संतोष चव्हाण हे परिसरातील तरुणांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या खेळातील आक्रमकता आणि मैदानाबाहेरील साधेपणा यामुळे त्यांना मोठा मित्रपरिवार लाभला होता. त्यांच्या अकाली निधनाची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.
ही बातमी जांभुळणेवाडी येथील सुहास घाटगे यांच्या कानावर पडताच त्यांना मोठा धक्का बसला. पंचायत समितीत लेखनिक म्हणून कार्यरत असलेले सुहास घाटगे हे कर्तव्यदक्ष, मनमिळावू आणि सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. मित्राच्या मृत्यूची बातमी समजताच नेमके काय घडले याची माहिती घेण्यासाठी आणि दुःखात सहभागी होण्यासाठी ते तातडीने घटनास्थळाकडे निघाले.
मात्र नियतीने त्यांच्या वाट्याला आणखी एक क्रूर खेळी ठेवली होती. मित्राच्या निधनाच्या विचारांनी व्यथित झालेल्या अवस्थेत ते रस्त्याने जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, सुहास घाटगे यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळापूर्वी मित्राच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी निघालेला व्यक्ती स्वतःच मृत्यूच्या अधीन झाल्याची बातमी समजताच परिसरात एकच खळबळ उडाली.
एकाच दिवशी दोन तरुण, कर्तबगार आणि लोकप्रिय व्यक्तींचा मृत्यू झाल्याने सांगशी व जांभुळणेवाडी गावातील वातावरण शोकमग्न झाले आहे. संतोष चव्हाण यांच्या निधनाचे दुःख अद्याप ताजे असतानाच सुहास घाटगे यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समोर आल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गावातील ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत प्रत्येकजण या घटनेने हळहळ व्यक्त करत आहे.
"मृत्यूची चौकशी करण्यासाठी निघालेल्या व्यक्तीलाच मृत्यूने गाठावे," हा दैवदुर्विलास अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे. दोन्ही कुटुंबांवर कोसळलेले हे दुःख न भरून येणारे असून, संपूर्ण गाव त्यांच्या दुःखात सहभागी झाले आहे. संतोष चव्हाण आणि सुहास घाटगे या दोघांच्या आठवणी गावकऱ्यांच्या मनात कायम जिवंत राहतील, अशा भावना व्यक्त होत आहेत.
या दुहेरी दुर्घटनेमुळे गगनबावडा तालुक्यात शोककळा पसरली असून, दोन्ही दिवंगतांना विविध स्तरांतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या