गगनबावडा : गगनबावडा-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तहसील कार्यालयासमोर गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सांगशी (ता. गगनबावडा) येथील संतोष मधुकर चव्हाण (वय ४२) हे जागीच ठार झाले. या घटनेची नोंद गगनबावडा पोलिस ठाण्यात झाली. हा अपघात मोटरसायकल घसरून झाल्याचा पंचनामा पोलिसांनी केला आहे. मात्र, गव्हा समोर आल्याने हा अपघात घडल्याचा संशय नातेवाईक व ग्रामस्थांनी केला. घटनेची माहिती मिळताच गगनबावडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात पाठविला. हा अपघात गव्याच्या धडकेने झाला असल्याने वनविभागाने तसा अधिकृत पंचनामा केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतली. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने वनक्षेत्रपाल अशोक राऊत व गगनबावडा पोलिसांशी चर्चा केली. त्यानंतर वनक्षेत्रपाल राऊत यांनी तात्काळ अपघातग्रस्त ठिकाणाची पाहणी केली. यावेळी गव्याच्या पायांचे ठसे आढळले. यावरून अपघात परिसरात गव्यांचा वावर स्पष्ट होत असल्याने, तसा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा करून तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याचे आश्वासन राऊत यांनी दिले. त्यानंतर नातेवाईकांनी शुक्रवारी दुपारी मृतदेह ताब्यात घेतला. संतोष चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.
गगनबावड्यात अपघात; सांगशीच्या तरुणाचा मृत्यू ; गव्याच्या धडकेचा ग्रामस्थांचा संशय
By -
जून २०, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या