मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी आता प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल होणार आहे. ‘RuPay On-The-Go’ NCMC सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच विविध सवलतधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभ आणि अचूक पद्धतीने मिळावा, तसेच प्रवास व्यवस्थापनात डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या या NCMC स्मार्ट कार्डमुळे सवलतींची पडताळणी, नोंदणी आणि वापर अधिक पारदर्शक पद्धतीने होणार आहे.
या कार्यक्रमावेळी काही लाभार्थ्यांना प्रत्यक्ष स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हे कार्ड वितरित करण्यात आले. या प्रसंगी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, मंत्रिमंडळातील सदस्य आणि एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यभर नोंदणी सुविधा
या योजनेची अंमलबजावणी Ebix Technologies Ltd. आणि NSDL Payments Bank यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. राज्यातील सर्व आगार आणि बसस्थानकांवर या कार्डसाठी नोंदणी व वितरण प्रक्रिया राबविण्यात येणार असून, याशिवाय सुमारे तीन हजार अधिकृत केंद्रांवरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
१०० रुपयांपासून टॉप-अप
या स्मार्ट कार्डद्वारे प्रवाशांना वॉलेट टॉप-अपची सुविधा उपलब्ध राहणार आहे. किमान १०० रुपयांपासून टॉप-अप करता येणार असून, बसमधील ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप तसेच एजंटमार्फत ही सुविधा मिळणार आहे. नव्या NCMC कार्डची किंमत १९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. डिजिटल एसटीकडे आणखी एक पाऊल या योजनेमुळे राज्यातील लाखो सवलतधारक प्रवाशांचा एसटी प्रवास अधिक आधुनिक, सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे. एसटीच्या सेवा व्यवस्थापनातही या माध्यमातून अधिक कार्यक्षमता आणि पारदर्शकता येणार असल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, “सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळेल,”असे सांगितले. तर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी, “या योजनेमुळे एसटी सेवांचा वापर अधिक सोयीस्कर आणि आधुनिक पद्धतीने करता येईल,” असे नमूद केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या