सांगली — श्री गणपती पंचायतन संस्थान ट्रस्ट, सांगली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृष्णानदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आज सकाळी सरकारी घाट, कृष्णाघाट, सांगली येथे कृष्णामाईची आरती करून उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमातून कृष्णा नदी स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि संवर्धित ठेवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. यावेळी नदी स्वच्छतेसाठी व प्रदूषणाविरोधात कार्य करण्यात विविध संस्थांचा सत्कार करण्यात आला.
सांगलीकरांच्या जीवनाशी अतूट नाते असलेल्या पवित्र कृष्णा नदीचे वाढते प्रदूषण, नदीकाठावरील अस्वच्छता आणि पर्यावरणीय समतोल बिघडण्याच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. नदीविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, नदीप्रेम आणि जबाबदारीची भावना रुजवणे, तसेच प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छतेचा संकल्प दृढ करणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश होता.
या अभियानाचा शुभारंभ युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या पुढाकाराने करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवक आणि नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाला पाठिंबा दर्शविला. उपस्थितांनी नदीकाठ परिसराची स्वच्छता करत “नदी वाचवा, पर्यावरण वाचवा” असा संदेश दिला.
यावेळी स्वच्छतादूत राकेश दड्डणावर कृष्णा नदी ही केवळ जलस्रोत नसून सांगलीच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी केवळ प्रशासन नव्हे तर प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने पुढे येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
अभियानादरम्यान नदीकाठ परिसरातील कचरा संकलन, स्वच्छता आणि जनजागृतीपर संदेश फलकांच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे नदीसंवर्धनाच्या चळवळीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास युवराजांनी व्यक्त केला.
कृष्णा नदी स्वच्छतेसाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असून, नागरिकांनीही नदीकाठ स्वच्छ राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन युवराज आदित्यराज यांच्याकडून यावेळी करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या