प्रतिष्ठा न्यूज
सांगली - आज संपूर्ण जग युद्धजन्य परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभे आहे. इतिहासाचे अवलोकन केल्यास लक्षात येते की, युगानुयुगे ज्या युद्धात मारुतिराय विराजमान झाले, तिथे विजय निश्चित झाला आहे! मग ते प्रभू श्रीरामांच्या सैन्यात राहून रावणाच्या लंकेचे दहन करणारे मारुतिराय असोत, वा महाभारतात अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावर विराजमान होऊन अधर्माविरुद्ध पांडवांना बळ देणारे हनुमान असोत! इतकेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’साठी समर्थ रामदास स्वामींनी गावोगावी मारुतीरायांची मंदिरे स्थापून जी बलोपासना सुरू केली, त्यातूनच स्वराज्याला आध्यात्मिक आणि सामर्थ्याचे बळ मिळाले.आज पुन्हा एकदा देश आणि धर्म संकटात असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा काळात प्रत्येक हिंदूमध्ये मारुतीरायांसारखे शौर्य, शक्ती आणि भक्ती जागृत व्हावी अन् येणार्या भीषण आपत्काळात मारुतीरायांच्या आशीर्वादाने हिंदूंचा विजय सुनिश्चित व्हावा, याच संकल्पनेतून श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी हा उपक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आदी राज्यांतील सामूहिक गदापूजनात हजारो युवकांनी सहभाग घेतला. तर सांगली जिल्ह्यात ५० हून अधिक ठिकाणी हा उपक्रम घेण्यात आला. यात प्रामुख्याने सलगरे येथे ५५ फुटी हनुमानाच्या मूर्तीच्या ठिकाणी , कवठेमहांकाळ तालुक्यातील श्री गिरीलिंग देवस्थान या ठिकाणांचा समावेश होता.
‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’
‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप या गदापूजन कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली ४ वर्ष सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत आणि यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांचा उत्तम सहभाग यात दिसून आला. या उपक्रमात सांगली येथे हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री. नितीन शिंदे, मिरज येथे सर्वश्री दत्ता भोकरे, सोमनाथ गोटखिंडे,संजय जाधव, निरंजन कद्दू, विटा येथे माजी नगरसेवक श्री. संजय सपकाळ यांसह अन्य उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या