गगनबावडा : कोल्हापूर-वैभववाडी मार्गावरील करूळ घाटात गुरुवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. सिमेंटने भरलेला ट्रक ३०० फूट खोल दरीत कोसळून चालक आणि क्लिनर असलेल्या पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांची ओळख
राजू प्रेमसिंग राजपूत (वय ५९) – चालक
राहुल राजू राजपूत (वय २०) – क्लीनर (रा. कोचलगी तांडा, ता. जि. विजापूर, कर्नाटक)
घटनेचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, राजू राजपूत हे गेल्या १०-१२ वर्षांपासून वाहतूक व्यवसायात होते. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून 'श्री' कंपनीचे सिमेंट भरून ते आपल्या ट्रकने (स्वतःच्या मालकीचा) वैभववाडीतील कोकिसरे येथे येत होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा राहुल क्लीनर म्हणून होता.
गुरुवारी पहाटे ४:४५ च्या सुमारास राजपूत यांचा ट्रक आणि त्यांच्या पाठीमागून येणारा दुसरा एक ट्रक गगनबावडा येथे पोहोचले. तिथे दोन्ही ट्रकच्या चालकांनी एकत्र चहा घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. करूळ घाट उतरत असताना, दिंडवणे गावाच्या हद्दीत राजू राजपूत यांचा ट्रकवरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेला ट्रक संरक्षक बॅरिकेट्स तोडून थेट ३०० फूट खोल दरीत कोसळला.
तातडीने बचावकार्य
हा अपघात पाठीमागून येणारे ट्रक चालक गोपाळ राठोड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
खोल दरी आणि अंधार यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते, मात्र सह्याद्री जीवरक्षक टीम आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस दरीत उतरले. दुर्दैवाने, ट्रकचा चक्काचूर झाल्याने चालक आणि क्लीनर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. अत्यंत कष्टाने दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
मदतीसाठी सरसावलेले हात
या मोहिमेत सह्याद्री जीवरक्षक टीमचे हेमंत पाटील, प्रदीप मोरे, राजेंद्र वारंग यांच्यासह भैरी भवानी कंपनीचे मालक गिरीधर रावराणे आणि अनेक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
राजू राजपूत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. कमावता बाप आणि तरुण मुलगा अशा दोघांचाही एकाच वेळी मृत्यू झाल्याने राजपूत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले, तेव्हा रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या