नाशिक : नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. न्यायालयाने आरोपी अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत पुन्हा पाच दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपास अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी गंभीर आरोप करताना, आरोपीकडून पाच जणांच्या हत्या (नरबळी) केल्याचा संशय व्यक्त केला. या दाव्यामुळे खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या दिशेने तपास सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
या प्रकरणाची सुरुवात एका पीडित महिलेने दाखल केलेल्या अत्याचाराच्या तक्रारीनंतर झाली. त्यानंतर पोलिसांनी तपास करताना आरोपीकडून जप्त केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये अनेक संशयास्पद व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंची सखोल चौकशी सुरू आहे.
तसेच, आरोपीच्या घराची झडती घेताना एक पिस्तूल जप्त करण्यात आले असून, त्याचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय, अनेक लोकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी देखील पुढे येत आहेत.
दरम्यान, वन्यजीव शिकार प्रकरणाचाही तपास सुरू असून, आरोपीने हरणाची शिकार करून कस्तुरी मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच, साप कुठून आणले जात होते आणि इतर गैरप्रकारांमध्ये कोणाचा सहभाग आहे, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात डिजिटल पुरावे गोळा करणे, तक्रारदारांचे जबाब नोंदवणे आणि इतर शक्य तितक्या बाबींची चौकशी करणे सुरू आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या