प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:“द्राक्ष शेतीत नुकसान टाळायचे असेल, तर प्रशिक्षण हाच एकमेव मार्ग” — या ठाम भूमिकेसह तासगावातील यशद्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी पुढे सरसावली असून,बागायतदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील द्राक्ष शेती सध्या मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभी आहे.वाढता उत्पादन खर्च,अवकाळी पावसाचे वाढते संकट,सूक्ष्म घड निर्मितीतील अडचणी,पान टिकवण्याचे प्रश्न आणि अनिश्चित बाजारपेठ यामुळे शेतकरी आर्थिक व तांत्रिक दबावाखाली सापडला आहे.हजारो एकरांवर विस्तारलेली द्राक्ष शेती आता ‘तांत्रिक शेती’ बनली असून, योग्य ज्ञानाशिवाय यश मिळवणे कठीण झाले आहे.इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच — प्रशासन,शिक्षण, तंत्रज्ञान — प्रत्येक ठिकाणी नियमित प्रशिक्षणाची मजबूत परंपरा आहे. मात्र शेतीत प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतींवर किंवा इतरांच्या अनुभवावर अवलंबून आहेत. “जो दुसऱ्यावर विसंबला,त्याचा कार्यभाग बुडाला,” या संतवचनाची प्रचिती आजच्या परिस्थितीत स्पष्टपणे दिसून येत आहे.गेल्या काही वर्षांत प्रशिक्षण घेतलेल्या बागायतदारांनी खर्च नियंत्रण,उत्पादनाचा दर्जा आणि स्थिरता यामध्ये मोठी झेप घेतली आहे.योग्य मार्गदर्शनामुळे निर्णयक्षमता वाढून बाग फेल जाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.याच पार्श्वभूमीवर,यशद्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे खरड छाटणीसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. ४ व ५ एप्रिल २०२६ रोजी तासगाव येथील जिजामाता मंगल कार्यालयात पार पडणार आहे.या प्रशिक्षणात पुढील महत्त्वाचे विषय सखोलपणे मांडले जाणार आहेत:ढगाळ वातावरणात सूक्ष्म घड निर्मिती तंत्र,पान शेवटपर्यंत टिकवण्याचे विज्ञान काडीची योग्य पक्वता साधण्याचे तंत्र,पानाचा योग्य आकार व बागेतील काड्यांचे संतुलन,युरोपियन बाजार पेठेसाठी दर्जेदार उत्पादन नियोजन,
माती व पाणी परीक्षणावर आधारित शेती,हवामानाचे अचूक निरीक्षण,कमी खर्चात जास्त दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे.“द्राक्ष शेतीत यश हे योगायोग नसून नियोजन,तांत्रिक ज्ञान आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांचे फळ आहे.त्यामुळे प्रशिक्षण घेणे हीच काळाची खरी गरज आहे,” असे मत कंपनीचे चेअरमन विजय कुंभार यांनी व्यक्त केले.नवीन तसेच अनुभवी बागायतदारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या शेतीत सकारात्मक बदल घडवून आणावा,असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या