भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा नगरसेवक अतुल माने यांची सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विविध संस्थांच्या व नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गणेशनगर येथील स्वदेशी व्हिला या श्री रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी हा सत्कार समारंभ संपन्न झाला. भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ, गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्ट, तसेच प्रभात क्रमांक १५ मधील सन्माननीय नागरिकांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांच्या हस्ते श्री अतुल माने यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री प्रमोद शेट्ये, श्री सतीश सारडा आदींनीही त्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना श्री रावसाहेब पाटील यांनी श्री माने यांच्या राजकीय प्रवासाचा गौरव करताना सांगितले की, अतिशय सामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राजकारणात ठसा उमटवला आहे. स्वर्गीय मदनभाऊ यांच्या नेतृत्वाखाली काम करताना दिसलेली त्यांची तळमळ आणि कार्यक्षमता आजही कायम असून, आमदार श्री सुधीर दादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाशी असलेली त्यांची निष्ठा यामुळेच त्यांना ही जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्या कार्यकाळात शहराच्या विकासाला निश्चित गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांनी शहर विकासासंदर्भात विविध सूचना व मागण्या मांडल्या.
सत्काराला उत्तर देताना श्री अतुल माने म्हणाले की, सामान्य कुटुंबातून राजकारणात येणे सोपे नव्हते; मात्र निष्ठा, मेहनत आणि धडाडीच्या जोरावर आज या पदापर्यंत पोहोचलो आहे. माझ्या राजकीय वाटचालीत मदनभाऊ यांनी मार्गदर्शन केले, तर सध्या आमदार श्री सुदीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील क्रीडांगणे, आरक्षित भूखंडांचा विकास, भाजी मंडई, महानगरपालिके ची नवीन इमारती, तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देणारी धोरणे राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते, प्रभाग क्रमांक १५ मधील भाजपाचे सर्व नेते, गणेश नगर चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, स्वदेशी उद्योग समूहाचे संचालक, तसेच गणेशनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी जैन प्रकोष्ट चे पश्चिम विभाग प्रमुख प्रशांत गोंडाजे यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या