सांगली जिल्हा परिषदेत झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्णायक विजय मिळवत सत्तेवर आपला झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
या निकालामुळे भाजपचे मनसुबे उधळले गेले आहेत. भाजपा व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परस्पर विरोधी घोषणा दिल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान भाजपा पासून फारकत घेतलेल्या माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवाराने भाजपाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे त्यांनी संजयकाका यांनी भाजपा बरोबर जवळीक केल्याची चर्चा रंगली आहे.
सांगली जिल्हा परिषदेत
एकूण ६१ सदस्य आहे. विजयी उमेदवारांना ३४ मते मिळाली आहेत. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात सत्ता स्थापनेसाठी अत्यंत चुरस निर्माण झाली होती. मतदानावेळी बदलत्या राजकीय घडामोडींमुळे निकालात गणिते बदलली.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची दोन मते भाजपच्या बाजूने गेली. मात्र शिवसेना (शिंदे गट) चे दोन सदस्य तटस्थ राहिल्याने भाजपची गणिते कोलमडली. याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला आणि त्यांनी बहुमताचा टप्पा सहज पार केला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपने सत्ता टिकवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले, मात्र जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम यांनी केलेल्या डावपेचांचा पुढे भाजपचे काही चालले नाही.
निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद परिसरात जल्लोष केला. गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत विजय साजरा करण्यात आला. “
महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेत सत्ता हस्तगत केल्यामुळे सांगलीच्या ग्रामीण राजकारणात महाविकास आघाडीची पकड अधिक मजबूत झाली आहे. आगामी निवडणुकांवरही या निकालाचे परिणाम दिसून येणार असून भारतीय जनता पार्टीसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या