प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव नगरपरिषद प्रशासनाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील घरपट्टी, पाणीपट्टी आणि गाळाभाडे वसुलीसाठी आक्रमक मोहीम सुरू केली असून, १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शहरात विशेष वसुली पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गुरुवारी सकाळी एका थकबाकीदाराची मालमत्ता सील करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली.गुरुवारी सकाळी पालिकेचे वसुली पथक शहरातील विविध भागात थकीत कर वसुलीसाठी फिरत असताना एका मालमत्ताधारकाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आढळून आली. यावेळी पथकाने वसुलीची कारवाई सुरू करताच संबंधित थकबाकीदार आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या उपस्थितीत पालिकेने संबंधित मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई पूर्ण केली.
या कारवाईमुळे शहरातील इतर थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून, ज्या मालमत्तांची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत आहे, त्यांच्या नळ कनेक्शनवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. थकीत कर न भरल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.दरम्यान, शासनाच्या नवीन ‘IWBP’ संगणकीय प्रणालीनुसार कर आकारणीतही कडक बदल करण्यात आले आहेत. मागील थकीत रकमेवर दरमहा २ टक्के दंड आकारला जात आहे. त्याचबरोबर सन २०२५-२६ च्या चालू बिलावरही ऑक्टोबर महिन्यापासून दरमहा २ टक्के दंड लागू करण्यात आला आहे.या संदर्भात मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी सांगितले की, शहराच्या विकासासाठी मालमत्ता कर व पाणीपट्टीची वेळेत वसुली होणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांनी प्रशासनासोबत वाद टाळून आपली थकबाकी त्वरित भरावी. अन्यथा मालमत्ता सील करणे, नळ कनेक्शन तोडणे यासारख्या कठोर कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच नागरिकांनी कर भरणा आणि अधिक माहितीसाठी तासगाव नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या