सांगली प्रतिनिधी : पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी च्या वतीने पद्मश्री नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष दर महिन्याला काव्यजागर संमेलनाचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात येऊन साजरे केले जात आहे. या जन्मशताब्दी वर्षात नारायण सुर्वे यांच्या नावे विविध पुरस्कारही प्रदान करून सन्मानित करण्यात येते.
काव्यजागर संमेलनाचे सहावे पुष्प शुक्रवार दि. २० मार्च रोजी दुपारी १२ वाजता पटवर्धन हायस्कुल, सांगली इथे आयोजित करण्यात आले आहे.
अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून डॉ.संभाजी मलघे या संमेलनाचे अध्यक्ष तर कृषिभूषण सुदाम भोरे स्वागताध्यक्ष आहेत. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. श्रीपाद जोशी, जत यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून कविवर्य आनंदहरी यांना पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार, वसुंधरा महाजन यांना मास्तरांची सावली सन्मान, आनंदराव जाधव यांना भला माणूस पुरस्कार, रजनी कानडे यांना जन्मशताब्दी कृतज्ञता सन्मान प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
सांगली येथील राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कुलला पद्मश्री नारायण सुर्वे संस्कारक्षम शाळा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून डॉ. दीपाली घाडगे, विटा आणि प्रा. संतोष काळे, नागाव यांना त्यांच्या साहित्यकृतींसाठी पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
काव्यजागर मध्ये राजेंद्र वाघ, संगीता झिंजुरके, अभिजित पाटील, जयश्री श्रीखंडे, प्रतिमा काळे, रावसाहेब यादव, स्वाती पाटील, विद्या पाटील, प्रभाकर वाघोले, मनीषा रायजादे, स्नेहा पावसकर आणि विनायक कुलकर्णी हे पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या कविता सादर करणार आहेत.
अकादमीचे सचिव पुरुषोत्तम सदाफुले, मानसी चिटणीस, इंद्रजित पाटोळे, अरुण गराडे, सीमा गांधी, राजू जाधव, कल्पना घारे हे अकादमीचे अध्यक्ष रवीभाऊ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन करीत असून साहित्यिक, साहित्यप्रेमींनी या संमेलनाला उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या