तासगाव:जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांच्या धडक भेटीत पार पडली.दि.१७ मार्च २०२६ रोजी झालेल्या या तपासणीदरम्यान पोलीस ठाण्याच्या कामकाजाची सखोल पाहणी करण्यात आली असून शिस्त, तपासाची गती आणि प्रशासनातील कार्यक्षमतेवर भर देण्यात आला.पोलीस अधीक्षक घुगे यांच्या आगमनावेळी पोलीस अंमलदारांनी मानवंदना देत स्वागत केले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले (जत विभाग, अतिरिक्त कार्यभार तासगाव), पोलीस निरीक्षक विशाल टकले, सपोनि दिपक पाटील, पोउपनि राजू अन्नछत्रे, विनय गोडसे, बाबासाहेब बदने, गाडे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तपासणीदरम्यान पोलीस अधीक्षकांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीची पाहणी करून विविध शाखांचे कामकाज तपासले.ठाण्यातील सर्व रजिस्टर, गुन्हे नोंदी, मुद्देमाल नोंदी आणि किमती साहित्याची बारकाईने तपासणी करण्यात आली.नोंदी अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देत कामकाजात काटेकोरपणा ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी पोलीस अंमलदारांचे “सिट रिमार्क” घेण्यात आले. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामगिरीचा आढावा घेत त्यांच्या ताब्यातील गुन्ह्यांच्या तपासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रलंबित गुन्ह्यांचा लवकर निपटारा करण्याचे आदेश देत तपासात गती आणण्यावर भर देण्यात आला.तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेऊन गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या अडचणी समजून घेत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले.यानंतर पोलीस अधिकारी व अंमलदारांचा दरबार घेण्यात आला.यामध्ये कर्तव्य बजावताना येणाऱ्या अडचणी, मनुष्यबळ व सुविधा यावर चर्चा झाली. पोलीस अधीक्षक घुगे यांनी या समस्या ऐकून घेत योग्य मार्गदर्शन करत कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला.दरम्यान,तासगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दाखवलेल्या तत्परतेचे विशेष कौतुक करण्यात आले.दि.४ जानेवारी २०२६ रोजी वासुंबे हद्दीत घडलेल्या घटनेत दिलीप यशवंत चव्हाण (वय ५३, रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) यांच्या गळ्यातील १९ ग्रॅम वजनाची, अंदाजे २ लाख ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती.या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १७/२०२६ अंतर्गत भा. न्या. संहिता कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या चार दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला.न्यायालयाची परवानगी घेऊन सदर सोन्याची चैन पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांच्या हस्ते फिर्यादीस परत करण्यात आली. यावेळी फिर्यादीने पोलीस प्रशासनाचे आभार मानले.पोलीस अधीक्षक घुगे यांनी पोलीस निरीक्षक विशाल टकले व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे कौतुक करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली व अशीच तत्परता कायम ठेवण्याचे आवाहन केले.
या धडक तपासणीमुळे तासगाव पोलीस ठाण्याच्या कामकाजाला नवी गती मिळणार असून, शिस्तबद्ध व परिणामकारक पोलिसिंगचा ठसा उमटला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या