प्रतिष्ठा न्यूज
सांगली : कवलापूर येथील विमानतळाबाबत महाराष्ट्र सरकार सकारात्मक आहे आणि त्याला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून संपूर्णपणे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी श्री. मोहोळ यांची आज भेट घेऊन कवलापूर विमानतळाबाबत चर्चा केली. या प्रस्तावासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे ताकदीने प्रयत्न करत आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत त्याची घोषणा केली आहे. हा प्रकल्प सांगली जिल्ह्याच्या आद्योगिक, आधुनिक शेती, व्यापारासाठी गरजेचा आहे. त्यामुळे त्याबाबत सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून आम्ही कवलापूर विमानतळासाठी संपूर्ण सहकार्य करणार आहोत. राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी जमिन खरेदी करून देणे गरजेचे आहे. कारण, या ठिकाणची जमिन कमी आहे. त्याबाबत सर्वेक्षणानंतर किती जमीन अतिरिक्त लागेल, हे स्पष्ट होईल. त्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. पालकमंत्र्यांसह सर्वच मंडळी त्याबाबत आग्रही आहेत. त्यामुळे हा प्रकल्प शंभर टक्के पूर्ण होईल, यात शंका नाही. जिथे अडचण येईल, तिथे मी स्वतः लक्ष घालणार आहे.’’
पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले, की कवलापूर येथे १६५ एकर क्षेत्र आहे. पूर्वी या ठिकाणी विमान उतरत होती. येथे विमानतळाचा विकास करायचा होता, मात्र तो विषय मागे पडला आणि त्यासोबत सांगली जिल्ह्याच्या विकासाला मर्यादा आल्या. विविध सिंचन योजनांमध्ये जिल्ह्यात शेतीची प्रगती जोरात सुरु आहे. जगभरात शेतमाल निर्यातीच्या संधी आहेत. शिवाय, संगीतनगरी मिरज, वैद्यकीय नगरी मिरज म्हणून आम्हाला वेगळ्या पातळीवर काम करण्यासाठी विमानतळ गरजेचे आहे. सांगलीतील व्यापार वाढीसाठी आयटी पार्कसाठी प्रकल्पदेखील महत्वाचा आहे. हे सारे विषय आम्ही विमानतळ झाले तरच ताकदीने पुढे नेऊ शकणार आहोत. त्यामुळे विमानतळासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने त्यासाठी बळ द्यावे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या