तासगाव : तासगाव तालुक्यातील विजयनगर येथील प्राचीन सिद्धनाथ मंदिरातील परंपरागत पूजेत असलेल्या सात पवित्र दगडी शिळांची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून नुकसान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेमुळे गावात तीव्र संताप व्यक्त होत असून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.याबाबत विजयनगर येथील ग्रामपंचायत सदस्य शशीकांत रावसो भोरडे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.भोरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयनगर गावातील सिद्धनाथ मंदिरात परंपरेने सात दगडी शिळांची पूजा केली जाते.तसेच शिळांच्या पाठीमागे कट्ट्यावर सिद्धनाथाची घडीव मूर्तीही आहे.मंदिरातील पूजाअर्चेची जबाबदारी पुजारी पंढरीनाथ दगडू डोंगरे सांभाळत आहेत.गावकऱ्यांनी जमा केलेल्या देणगीतून गेल्या तीन वर्षांपासून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून हे काम गावातील संतोष लक्ष्मण पवार यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.दि.१७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री पुजारी पंढरीनाथ डोंगरे यांनी मंदिरात पूजा करून घरी गेले होते.मात्र दुसऱ्या दिवशी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा मंदिरात पूजा करण्यासाठी आल्यावर मंदिरातील सात दगडी शिळा जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती ग्रामपंचायत सदस्य शशीकांत भोरडे यांना दिल्यानंतर भोरडे तसेच गावातील दत्ताजी पवार,धनाजी पवार,मारुती पार्टे, वामन कणसे,रामचंद्र भोरडे,संदीप भोरडे,लक्ष्मण कोंडाळकर,आनंदा चौधरी आणि रामचंद्र धनवे यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली.
पाहणीदरम्यान सात शिळांपैकी पाच शिळा पूर्णपणे गायब झालेल्या असून दोन शिळा फरशीमधून कापून काढल्याचे दिसून आले.यानंतर ग्रामस्थांनी मंदिर परिसर तसेच गावात सर्वत्र शोध घेतला;मात्र शिळांचा कोणताही मागमूस लागला नाही.यामुळे अज्ञात व्यक्तींनी पवित्र दगडी शिळांचे नुकसान करून त्या जागेवरून हटवून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.दरम्यान,या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाकडून संथ गतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि तपासाच्या दिशेवर नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात असून, दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या