प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :तासगाव शहरात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांनी अचानक जोर धरल्याने काही ठिकाणी नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की शहरात आणि परिसरात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.तहसीलदार अतुल पाटोळे यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, पेट्रोल संपल्याच्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत. सध्या इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक गर्दी करू नये.
अफवांमुळे काही पेट्रोल पंपांवर अचानक रांगा लागल्या होत्या, परंतु प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती सुरळीत केली. कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसताना केवळ अफवांमुळे निर्माण झालेली ही घबराट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.तहसीलदार पाटोळे यांनी इशारा देताना सांगितले की, जाणीवपूर्वक अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सोशल मीडियावर किंवा अन्य मार्गाने चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर प्रशासनाचे लक्ष असून, अशा कृत्यांना मुळीच सहन केले जाणार नाही.
नागरिकांनी संयम बाळगून नेहमीप्रमाणेच इंधन भरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोणतीही शंका असल्यास अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.दरम्यान, तासगावात अफवांपेक्षा वास्तव वेगळे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, प्रशासनाने परिस्थितीवर घट्ट नियंत्रण ठेवले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या