प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 2 : उमराणी येथील सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या ऐतिहासिक स्मारकाचे सुशोभिकरण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रस्ताव द्यावा. तसेच, पर्यटन विकासासाठी ठोस नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या.
जत तालुक्यातील उमराणी येथील सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या ऐतिहासिक स्मारकास भेट देऊन पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जत उपविभागीय अधिकारी अजय नष्टे, तहसिलदार प्रवीण धानोरकर, कृषि विभागातील अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भेटीदरम्यान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्मारकाची सविस्तर माहिती घेतली. छत्रपती शिवाजी महाराज व सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमाचा इतिहास जाणून घेत स्मारकाच्या जतन, संवर्धन, अद्ययावतीकरण व सुशोभीकरणासाठी ठोस नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. स्मारक परिसर ऐतिहासिक काळाशी सुसंगत राहील, याची काळजी घेत परिसराचा सर्वांगीण विकास करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. तसेच स्मारक सुशोभिकरणासाठी जतचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी नियोजनबद्ध प्रस्ताव सादर करावेत, असेही सांगितले.
कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पाणलोट विकास घटक) २.० उत्पादन पध्दती अंतर्गत उमराणी येथे उभारण्यात आलेल्या उत्तम शिंदे यांच्या ‘बेदाणा प्रक्रिया उद्योगा’लाही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी शेतीसोबत पूरक उद्योग उभारून उत्पन्नवाढ साधावी याबाबत मार्गदर्शन केले.
उमराणी येथील ऐतिहासिक स्मारक व शेतीपूरक उद्योग यांची सांगड घालून जत, उमराणी व रामतीर्थ (कर्नाटक) येथील महादेव मंदिर यांचा समावेश असलेला पर्यटन सर्किट मार्ग विकसित करण्याची संकल्पनाही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी मांडली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या