प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 2 : जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जत तालुक्यातील गुगवाड येथील सागर पाटील व हुच्चाना नाईक यांच्या रेशीम प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी अतिरीक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी विजया यादव, जत उपविभागीय अधिकारी अजय नष्टे तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि कृषि विभागातील अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रकल्पातील तुती लागवड तसेच कीटक संगोपन गृहाची पाहणी करून प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधत रेशीम शेतीच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधींबाबत चर्चा करण्यात आली.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यात ‘महा रेशीम अभियान २०२६’ मोठ्या प्रमाणावर आणि प्रभावीपणे राबविण्याबाबत सर्व तहसीलदारांना निर्देश दिले. रेशीम उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीमुळे जिल्ह्यात रेशीम शेतीला चालना मिळणार असून अधिकाधिक शेतकरी या अभियानात सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना मोठ्या प्रमाणात तुती लागवड करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या