प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :ग्रहण लागले की गर्भवती महिलांनी भाजी चिरू नये,कात्री लावू नये किंवा काही खाऊ नये, अन्यथा बाळावर परिणाम होतो, अशी समजूत आजही अनेक घरांमध्ये पाळली जाते. “ग्रहणात भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात,” ही भीती अनेक कुटुंबांमध्ये रुजलेली आहे.मात्र तासगावातील पागा गल्ली परिसरात राहणाऱ्या सौ प्रमिला योगेश शिंदे यांनी या अंधश्रद्धेला धाडसाने फेटाळून लावत समाजासमोर आदर्श ठेवला.ग्रहण सुरू होताच पाच महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सौ. प्रमिला शिंदे यांनी निर्धास्तपणे कांदा व कोबी चिरून अंधविश्वासाला छेद दिला.यासाठी त्यांना पती योगेश आनंदा शिंदे यांचा ठाम पाठिंबा लाभला.या संदर्भात योगेश शिंदे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या आईच्या मनातील जुन्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मदत मागितली होती.त्यानुसार सावर्डे येथील अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते भास्कर सदाकळे यांनी शिंदे कुटुंबाच्या घरी भेट देत सविस्तर चर्चा केली.भास्कर सदाकळे,रामचंद्र सदाकळे व रमेश गायकवाड यांनी शिंदे यांच्या आई सुवर्णा शिंदे यांच्याशी संवाद साधून चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे केवळ सावल्यांचे नैसर्गिक खेळ असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या समजावून सांगितले. चर्चेनंतर सुवर्णा शिंदे यांनी सुनेला भाजी चिरण्यास परवानगी देत अंधश्रद्धेवर मात केली.या कुटुंबाच्या धाडसाचे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कौतुक केले असून समाजातील इतर गर्भवती महिलांनीही अशा अंधश्रद्धांना बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तासगावातील या घटनेमुळे अंधश्रद्धेविरोधात सकारात्मक संदेश गेला असून, समाजात वैज्ञानिक विचारसरणी बळकट करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या