सांगली प्रतिनिधी : श्री राम नवमी निमित्त येथील कृष्णा नदीकाठी माई घाटावर गुरुवारी (ता. १५) तब्बल ११ हजार १११ दिवे उजळणार आहेत. शिवाय, राम भजन व भक्तीगीतांचा कार्यक्रम आणि आकर्षक आतषबाजी केली जाणार आहे. पृथ्वीराज पाटील फौंडेशन, संस्कार भारती आणि ज्ञानमंथन संस्था सांगली यांनी संयुक्तपणे हा उपक्रम आयोजित केला आहे. सांगलीकरांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.
ते म्हणाले, की रामभक्तीचा अलौकिक सोहळा दरवर्षी सांगलीत कृष्णा नदी काठावर होत असतो. यावर्षीही ती परंपरा कायम राहणार आहे. संस्कार भारती आणि ज्ञान मंथन संथेच्या सहकार्याने हा उपक्रम घेतला आहे. कृष्णाकाठी रामभक्तीची ज्योत उजळणार आहे. ‘एक दिवा प्रभू श्री रामासाठी’, असे आवाहन आम्ही सांगलीकरांना केले आहे. या ठिकाणी ५१ फुटी भव्य प्रतिमा उभी करण्यात येत आहे. त्यासमोर महाआरती, दिपोत्सव, आतषबाजी, राम भजन दी कार्यक्रम होतील. परेश पेठ आणि त्यांचा संगीत संच गीतांचे सादरीकरण करेल. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम सुरु होणार आहे. दिवे प्रज्वलीत करण्यासाठी तेल व वातीची सोय कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आली आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रासह परिसरातील राम भक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे.’’
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या