तासगाव:चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या तासगाव येथील श्रीराम मंदिरातील 192 व्या श्रीरामोत्सवाला गुरुवार, 19 मार्च 2026 पासून उत्साहात प्रारंभ होत असून,यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची भव्य रेलचेल आयोजित करण्यात आली आहे.या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीरामदेव ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप जोगळेकर यांनी केले आहे.
मराठी नववर्षाच्या स्वागताने उत्सवाची सुरुवात होत असून पहाटे 5.30 वाजता नववर्ष कार्यक्रम पार पडणार आहे. सकाळी 9 वाजता सिद्धेश्वर रोड येथील श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात येणार असून, शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
उत्सवादरम्यान दररोज विविध नित्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे 5.30 वाजता काकड आरती, सकाळी 6 वाजता जनजागृती प्रभात फेरी, 7 वाजता श्रींची महापूजा, 7.30 वाजता महाआरती, दुपारी 12.15 वाजता महानैवेद्य असे कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत विविध भजनी मंडळांकडून भजनसेवा सादर केली जाणार आहे.दुपारी 4.30 ते 5.30 या वेळेत प्रवचन, सायंकाळी 5.30 वाजता श्रीरामाची दृष्ट काढून फराळाचा नैवेद्य, सायंकाळी 6 वाजता ह. भ. प. संदीप बुवा मांडके (पुणे) यांचे सुश्राव्य कीर्तन, तर रात्री 8.15 वाजता करुणाष्टके, सवाया व रामरक्षा पठण असे कार्यक्रम 25 मार्चपर्यंत नियमित पार पडणार आहेत.
मंगळवार, 24 मार्च रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत माता-भगिनींसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 26 मार्च रोजी श्रीराम नवमी निमित्त सकाळी 10 वाजता जन्मकाळ कीर्तनास सुरुवात होऊन दुपारी 12.30 वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.27 मार्च रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 28 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत वसंत पूजा पार पडणार असून रात्री 9 वाजता ‘सारेगम’ फेम सौ. स्वागता पोतनीस व सहकारी यांचा भावगीत-भक्तीगीतांचा स्वराभिषेक कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी श्री लक्ष्मीनारायण सहकारी पतसंस्था, तासगाव यांचे सहकार्य लाभले आहे.रविवार, 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता ह. भ. प. प्रज्वल बुवा गोसावी यांच्या लळीत व गोपालकाला कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.
संपूर्ण उत्सव काळात तासगाव नगरीत भक्तीमय वातावरण निर्माण होणार असून, नागरिकांनी या धार्मिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन श्रीरामदेव ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या