प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी प्रतिष्ठापना केलेल्या तासगाव येथील श्रीगणेशाचा २४७ वा वाढदिवस उद्या दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी भक्तिभावाने साजरा होत आहे.इ.स. १७८१ ते १७९५ या कालखंडात मराठा साम्राज्याची धुरा सांभाळणाऱ्या परशुरामभाऊंनी शूर व बलाढ्य शत्रू टिपू सुलतान याच्याविरुद्धच्या सततच्या युद्धमालिकेत कधीही पराभव स्वीकारला नाही.वारंवार परराज्यात मुक्काम करूनही त्यांनी तासगावमध्ये भव्य श्री गणपति मंदिराची उभारणी केली.मंदिरातील नित्य-नैमित्तिक परिपाठ,उत्सवांची परंपरा आणि नियोजन यांना त्यांनी अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध रूप दिले. त्यांच्या स्वामिनिष्ठा आणि गणेशभक्तीला त्यांच्या सद्गुणांत अग्रस्थान होते.फाल्गुन शुद्ध द्वितीया या श्रींच्या वाढदिवसानिमित्त सकाळी पुण्याहवाचन व मंगल वाद्यवादनाने कार्यक्रमांची सुरुवात होईल.दुपारी १०८ विविध द्रव्ययुक्त षोडशोपचारे महापूजा,वेदमंत्रपठण व होमहवन होणार आहे.त्यानंतर ह.भ.प. गजाननबुवा वठारकर यांचे नारदीय कीर्तन होईल.सायंकाळी श्रींची पारंपरिक छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.मुख्य पूजा मंदिराचे विश्वस्त श्री राजेंद्र परशुराम पटवर्धन व राहुल राजेंद्र पटवर्धन यांच्या हस्ते होणार असून,पौरोहित्य वंशपरंपरागत पुजारी पंडित दीपक पांडुरंग जोशी व पंडित अनंत शंकर जोशी करणार आहेत.त्यांना पं. अथर्व अनंत जोशी,पं.प्रज्ज्वल गोसावी,पं.श्रीपाद जोशी यांची साथ लाभणार आहे.सोहळ्यात लक्ष्मण कांबळे (शहनाई व सुंद्रीवादक), भूपाल माने व सहकारी (ब्रासबॅंड पथक),महादेव माळी (गोंधळी), तसेच मंदार म्हेत्रे व सोमनाथ पैलवान (शंखवादक) यांचा सहभाग लक्षणीय ठरणार आहे.विश्वस्त सौ. श्रीमंत सितारा राजेंद्र पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे मुख्य व्यवस्थापक पवनसिंह कुडमल यांच्यासह दिलीप पवार,प्रताप पवार, प्रतीक पाटील,गजानन घाटगे,राजू पाटील,राहुल जाधव,रणजित चव्हाण,महेश कदम,ओम काकडे,अशोक कुंभार,विष्णू मदने,प्रणित सुतार,समीर यादव तसेच श्री काशिविश्वेश्वर मंदिराचे पुजारी शशिकांत देसाई आदी सहकारी या सोहळ्याच्या नियोजनात सक्रिय आहेत.
तासगावकरांसाठी हा केवळ उत्सव नसून इतिहास,परंपरा आणि श्रद्धेचा संगम असलेला अभिमानाचा दिवस ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या