प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :नागाव कवठे येथील जुन्या काळापासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे तानाजी ढोबळे यांचा मुलगा प्रवीण तानाजी ढोबळे याने जिद्द,कष्ट आणि सातत्याच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवत शासकीय अधिकारी होण्याचा मान पटकावला आहे.त्यांच्या या आदर्शवत यशाबद्दल ढोबळे कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.प्रवीण ढोबळे याने प्राथमिक शिक्षण नागाव कवठे येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले.त्यानंतर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल,कवठे एकंद येथे यशस्वीरीत्या पूर्ण केले.उच्च माध्यमिक शिक्षणासाठी पी.डी.पी. कॉलेज,तासगाव येथे शिक्षण घेत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.पुढे सिंहगड इन्स्टिट्यूट,पुणे येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर,प्रवीणने सलग तीन वर्षे पुणे येथे राहून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर भर दिला.या मेहनतीचे फळ त्याला जानेवारी २०२६ मध्ये मिळाले.सरळ सेवा परीक्षेत रँक १७ (जनरल गट) मिळवत महाराष्ट्र शासनाच्या भूमिअभिलेख विभागात भुकरमापक (गट-क) या पदावर त्याची निवड झाली.या यशामध्ये प्रवीणला आई पुष्पा ढोबळे,वडील तानाजी ढोबळे तसेच चुलते प्रा. शिवाजी ढोबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले.यशाबद्दल भावना व्यक्त करताना प्रवीण ढोबळे म्हणाला, “लहानपणापासून आजी आणि आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव होती.वृत्तपत्र वाटपाच्या व्यवसायामुळे पहाटे लवकर उठण्याची सवय लागली,जी अभ्यासासाठी उपयोगी ठरली. कुटुंबातील संस्कार आणि आई-वडिलांच्या पाठबळामुळेच हा यशाचा टप्पा गाठता आला. यूपीएससी आणि एमपीएससीचा निकाल अद्याप बाकी असून, त्यातही यश मिळेल अशी अपेक्षा आहे.”
प्रवीण ढोबळे यांच्या या यशामुळे नागाव कवठे परिसरात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या