प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव नगरपालिकेचा सन २०२६-२७ चा अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर झाला.मात्र अर्थसंकल्प मंजूर झाला असला तरी पालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे बोलले जात आहे.तिजोरीत खडखडाट असल्याने सत्ताधारी **अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विकासकामांसाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.15 वा वित्त आयोग गेली दोन वर्षे प्राप्त झाला नसल्याने आर्थिक तुटवडा अधिकच वाढला असल्याचे समजते.पालिकेला विविध करांमधून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने महसूल घटल्याची कबुली अप्रत्यक्ष पणे प्रशासनाकडून दिली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना विकासकामे तर दूरच,पण ऐन उन्हाळ्यात शहराचा नियमित कारभार सुरळीत ठेवणेही मोठे आव्हान ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.विरोधकही “बहुमताच्या जोरावर अर्थसंकल्प मंजूर; पण निधी कुठून आणणार?” असा सवाल उपस्थित करत आहेत.
मुख्याधिकारी लेंडवे यांनी थकबाकी वसुली मोहीम आक्रमकपणे राबवावी लागणार असल्याचे जाहीर करत, नवीन मालमत्ता करजाळ्यात आणणे आणि काटकसरीचे धोरण स्वीकारणे अपरिहार्य असल्याचे सांगितले आहे.यावेळी नगराध्यक्ष सौ.पाटिल यांनी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत कोणताही राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही,असा स्पष्ट इशारा देत प्रशासनाला पाठबळ दिले.एकूणच,अर्थसंकल्प बहुमताने मंजूर झाला असला तरी आर्थिक कोंडीमुळे सत्ताधारी गटाला आगामी काळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.आता ‘निधी उभारणी’ आणि ‘थकबाकी वसुली’ हेच सत्ताधाऱ्यांसाठी खरे राजकीय रणांगण ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या