प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली: डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पूजनाने झाली. प्राचार्य प्रा. डॉ. एस. आर. कुंभार यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसोबत मूल्याधिष्ठित शिक्षण आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
पाहुण्यांचे स्वागत व परिचय डॉ. ए. एम. पुराणिक यांनी करून दिला. वरिष्ठ महाविद्यालयाचा अहवाल प्रा. डॉ. एस. आर. ठाकूर यांनी, तर कनिष्ठ विभागाचा अहवाल पर्यवेक्षक श्री. जी. डी. नागरगोजे यांनी सादर केला. जिमखाना विभागाचा अहवाल वरिष्ठ विभागासाठी डॉ. जी. आर. सिंहासने आणि कनिष्ठ विभागासाठी श्री. डी. एस. मुळूक यांनी मांडला.
समारंभाचे प्रमुख पाहुणे मोहन वाटवे (नगरसेवक, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व माजी विद्यार्थी) यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि सामाजिक जाणीव यांच्या बळावर यश संपादन करता येते, असे मार्गदर्शन केले. त्यांनी महाविद्यालयाशी असलेले भावनिक नातेही व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आर. आर. ब्रह्मनाळकर यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
यानंतर विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि टाळ्यांच्या गजरात संपूर्ण सभागृह दुमदुमले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सरोज कोरे यांनी केले. त्यांना स्वाती निरलगी, प्राची तारळेकर, मनीषा मोहनानी आणि प्रवीण पारधी यांनी सहाय्य केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एम. बी. बागूल यांनी केले.
समारंभ यशस्वी होण्यासाठी प्राचार्य सुरेश कुंभार, आजीव सदस्य श्री. एन. के. आपटे, तसेच प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या