प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : क्रांतीज्योती घरेलू कामगार संघटना व सेवा सदन फाउंडेशन, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली–मिरज क्षेत्रातील घरेलू कामगारांसाठी रेशन कार्ड व विविध शासकीय योजनांबाबत आयोजित करण्यात आलेली मार्गदर्शन कार्यशाळा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सेवा सदन हॉस्पिटल, मिरज येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन मा. डॉ. रविकांत पाटील, चेअरमन – दत्तोपंथ ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण बोर्ड, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी घरेलू कामगारांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण आवश्यक असल्याचे नमूद केले तसेच शासकीय योजनांचा योग्य लाभ घेण्यासाठी संघटनात्मक ताकदीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यशाळेमध्ये रेशन कार्ड व त्यासंदर्भातील विविध अडचणी याबाबत मा. वर्षा कदम, जिल्हा पुरवठा निरीक्षक, मिरज यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच “कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३” या विषयावर बालाजी बोकलवाड, तालुका संरक्षण अधिकारी, मिरज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत महिलांच्या सुरक्षिततेविषयी महत्त्वपूर्ण मुद्दे स्पष्ट केले. विविध शासकीय योजनांबाबत सामाजिक कार्यकर्ते मा. सर्जेराव पाटील यांनी योजनांची माहिती देत त्या कशा पद्धतीने मिळवता येतील, याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश घरेलू कामगारांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच कार्यस्थळी सुरक्षिततेबाबत माहिती देणे हा होता.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी किरण कांबळे, मिनाक्षी कोळी, राहुल व्हनमोरे, रुपाली कांबळे, पूजा पागद, आक्काताई वंजारी,कस्तुरी कोळी, वनिता रास्ते, लीला बिरणगे इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने सहभागी मान्यवरांचे आभार मानण्यात आले. तसेच कार्यक्रमाचा समारोप सेवासदन फाऊंडेशन यांच्या वतीने अल्पोपहार देऊन करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या