प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील विश्रामगृहात आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तासगाव व कवठेमहांकाळ या दोन्ही तालुक्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीस प्रांताधिकारी उत्तम दिघे,तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे,कवठेमहांकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे,गटविकास अधिकारी संताजी पाटील व उल्हास भांगे, तालुका क्रीडा अधिकारी प्रज्ञा वरेकर,तालुका कृषी अधिकारी फोंडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत विविध विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच प्रत्येक पंचायत समिती गणानुसार २५ कि.मी. लांबीच्या पाणंद रस्त्यांसाठी क्लस्टर पद्धतीने नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.तासगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास तातडीच्या सूचना देण्यात आल्या.याशिवाय तालुक्यात खते व बियाण्यांची कमतरता भासत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पुढील हंगामासाठी काटेकोर नियोजन करून मागणी वेळेत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच ७ मार्च ते १५ मे दरम्यान ‘महाराजस्व अभियान’ संपूर्ण मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
बैठकीत विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देत नागरिकांच्या अडचणी तत्काळ मार्गी लावण्याचे आवाहन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या