प्रतिष्ठा न्यूज
येळावी प्रतिनिधी : तासगाव तालुक्यातील येळावी जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उमेदवार कुलदीप देवकुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ एका वेगळ्या आणि अर्थपूर्ण उपक्रमातून करण्यात आला. प्रचाराचा श्रीगणेशा थेट लाडक्या बहिणी, माता व भगिनींच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आल्याने कार्यक्रमाला सामाजिक व भावनिक अधिष्ठान लाभले. या वेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली असून, संपूर्ण परिसर महिलासन्मानाच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
महिलांना समान संधी, सन्मान व सुरक्षिततेची भाषा राजकारणात अनेकदा ऐकायला मिळते. मात्र ती केवळ भाषणापुरती मर्यादित न ठेवता ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली आहे. त्याच विचारांची पुढची पायरी म्हणून येळावी गटातील उमेदवार कुलदीप देवकुळे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात महिलांच्या हस्ते करून महिलांचा सन्मान केला. ग्रामीण राजकारणात महिलांना केंद्रस्थानी ठेवणारा हा उपक्रम विशेष व लक्षवेधी ठरला आहे.
या कार्यक्रमात महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक माता-भगिनींनी श्रीफळ वाढवताना “आमचा मान राखणारा उमेदवार आम्हाला हवा” अशी भावना व्यक्त केली. महिलांच्या सहभागामुळे प्रचाराला वेगळी उर्जा मिळाली असून, येळावे गटात महिलांचा विश्वास व पाठिंबा देवकुळे यांच्यामागे ठामपणे उभा राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावेळी बोलताना उमेदवार कुलदीप देवकुळे म्हणाले,
“महिलांचा सन्मान म्हणजे अर्ध्या अधिक जगाचा सन्मान आहे. तो कुणाची कृपा नसून महिलांचा नैसर्गिक हक्क आहे. कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीत महिलांचा मोलाचा वाटा असून, त्यांच्या सशक्तीकरणाशिवाय खरा विकास शक्य नाही. या लाडक्या बहिणीच मला खात्रीने विजयी करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
देवकुळे यांनी पुढे सांगितले की, जिल्हा परिषद स्तरावर महिलांसाठी आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार, बचतगटांना प्रोत्साहन, तसेच सुरक्षिततेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल. महिलांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या सन्मानातून प्रचाराची सुरुवात करून कुलदीप देवकुळे यांनी येळावी गटाच्या निवडणूक रणधुमाळीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘महिलांचा विश्वास – विकासाचा पाया’ या भूमिकेवर आधारित हा प्रचार येळावी गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता ठेवतो, अशी चर्चा सध्या तासगाव तालुक्यात रंगू लागली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या