प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : भारतीय जनसंघ व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख विचारवंत, तत्त्वज्ञ व संघटन शिल्पकार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी सर्वत्र “समर्पण दिवस” म्हणून साजरी केली जाते. याच दिनाचे औचित्य साधत भाजपा कार्यालय, मिरज येथे श्रद्धापूर्वक "समर्पण दिवस” करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या अखंड मानवतावाद या तत्त्वज्ञानाचा तसेच अंत्योदय या संकल्पनेचा सखोल आढावा घेतला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचली पाहिजेत, हा त्यांचा विचार आजच्या काळातही तितकाच मार्गदर्शक असल्याचे मत स्वातीताईनी व्यक्त केले. त्यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा व राष्ट्रनिष्ठेच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन कार्य करण्याचा संकल्पही यावेळी उपस्थितांनी केला.
भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला दिशा देणारे असल्याचे सांगितले. संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे तत्त्वज्ञान प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान त्यांच्या जीवनप्रवास, विचारसरणी व राष्ट्रसेवेतील योगदानावर माहितीपर भाषणे झाली. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहितासाठी निष्ठेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. संपूर्ण वातावरणात कृतज्ञता, प्रेरणा व समर्पणाची भावना दाटून आली होती.
यावेळी महिला मोर्चा पदाधिकारी माजी महापौर संगीता खोत, अनिता हारगे, साधना माळी, सारिका राहुटे, गंगुताई नाईक, प्राची देसाई, गायत्री सातपुते, सीमा मगदूम, मोहिनी कुलकर्णी वर्षांराणी वांडरे व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या आदरांजलीच्या कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांचे आभार मानून करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या