प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्या तातडीने सोडविण्यासाठी ‘ऊर्जा मित्र’ बैठकीसारखा उपक्रम गगनबावडा तालुक्यातही सुरू करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सध्या वीज पुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा वीजपुरवठा, मीटरमधील बिघाड, तक्रारींवर विलंबाने कार्यवाही, तसेच अधिकाऱ्यांशी थेट संवादाचा अभाव अशा समस्या वारंवार निर्माण होत आहेत. त्यामुळे काहीही कारण नसताना गैरसमज व विवाद निर्माण होतात.या पार्श्वभूमीवर वीज ग्राहक, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि महावितरण अधिकारी यांच्यात थेट संवाद होण्यासाठी ‘ऊर्जा मित्र’ बैठका प्रभावी ठरू शकतात, असे मत व्यक्त होत आहे.
या बैठकीमुळे ग्राहकांना त्यांच्या तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळेल. तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित प्रश्नांवर त्वरित निर्णय घेणे, दुरुस्तीचे नियोजन करणे आणि भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी उपाययोजना ठरविणे शक्य होईल.
गगनबावडा तालुका हा डोंगराळ आणि दुर्गम भाग असल्यामुळे येथे वीजपुरवठ्याच्या समस्या अधिक प्रमाणात जाणवतात. त्यामुळे तालुकास्तरावर दर महिन्याला नियमित ‘ऊर्जा मित्र’ बैठक आयोजित करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र शासन यांनी पुढाकार घेऊन महावितरण विभागाला आवश्यक सूचना द्याव्यात, तसेच ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या