प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली येथील श्री गुजराती सेवा समाज संचलित श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व मेरा युवा भारत, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी “स्वामी विवेकानंदांचे विचार आणि तत्त्वज्ञान” या विषयावर अतिथी व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. एम. पी. कांबळे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात जिल्हा युवा अधिकारी मा. श्री. राहुल डोंगरे यांनी युवक घडणीमध्ये विवेकानंद विचारांचे महत्त्व विशद केले. प्रमुख अतिथी मा. श्री. शाहीन शेख यांनी मार्गदर्शन करताना स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या युवकांना आत्मविश्वास, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रसेवेकडे प्रेरित करतात, असे प्रतिपादन केले. तसेच स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आजच्या समाजात आणि युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासात कसा उपयोग होऊ शकतो, यावर सखोल प्रकाश टाकला. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थिनींना नवी दिशा मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य मा. डॉ. एल. आर. पाटील होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात विवेकानंदांचे तत्त्वज्ञान हे मूल्याधिष्ठित शिक्षणाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भक्ती जाधव यांनी केले तर आभार प्रा. श्री. एस. व्ही. गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, स्वयंसेवक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या