प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : थंडीमध्ये ऊब देणारा आणि माणसामाणसांत गोडवा निर्माण करणारा मकर संक्रांत हा सण खाडे शैक्षणिक संकुल, येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी ‘भाजी बाजार’ अर्थात ‘आनंद बाजार’ भरवून संक्रांतीचा आनंद द्विगुणित केला.
या उपक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतः भाजीपाला विक्री करत व्यवहारज्ञान, संवादकौशल्य व आत्मविश्वासाचा अनुभव घेतला. “ तीळगुळ घ्या, गोड बोला, गोड रहा” या संक्रांतीच्या संदेशाला अनुसरून विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत आनंदाने विक्री केली.
या अनोख्या उपक्रमाला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवून मुलांची भाजी खरेदी केली. आपल्या मुलांच्या उपक्रमशीलतेला प्रोत्साहन देत त्यांनी आनंद बाजाराला भरभरून साथ दिली.
अशा शैक्षणिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञानच नव्हे तर संस्कार, सहकार्य, आत्मनिर्भरता व सामाजिक जाणीव विकसित होते, असे मत यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापिका संगीता पाटील व करुणा माने यांनी केलेल्या या सुंदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमास माजी कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी शिक्षक, पालक विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या