प्रतिष्ठा न्यूज
सांगली, ता. २० : पुस्तकांनी मला जीवनाच्या संघर्षात लढायला शिकवलं, जगण्यासाठी प्रेरणा दिली, असे मत कर्नाळ (ता. मिरज) येथील संवेदनशील लेखक सचिन पाटील यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव कराडकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त सचिन पाटील यांचा 'सेवारती' पुरस्काराने गौरव झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ झाला. मंगळवार दि. २० जानेवारी रोजी हा कार्यक्रम श्वास सभागृहात झाला.
यावेळी डॉ. अनिल मडके, सचिन पाटील तसेच सचिन यांच्यावर जिद्दीने उपचार करणारे डॉ. सुनील पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
वयाच्या २० व्या वर्षी झालेल्या अपघातात दोन्ही पाय गमावल्यानंतर गेली सत्तावीस वर्षे त्यांनी कथा लेखन करीत स्वतःची ओळख तयार केली. 'अवकाळी विळखा, गावठी गिच्चा , पाय आणि वाटा, येरे येरे पैसा' असे पाच कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या लेखनाची राज्यभरातील सांस्कृतिक कार्याची दखल घेत त्यांना आजवर ४० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. सेवारती पुरस्कार समारंभात त्यांनी आपल्या आयुष्याचा संघर्षमय पट मांडला.
श्री पाटील म्हणाले, "आमचं अल्पभूधारक शेतकरी कुटुंब. बैलगाडीसह चारा आणायला गेलो होतो. त्यादिवशी अंगावर चारा भरलेली बैलगाडी पडली. त्यानंतर डॉक्टरांनी जास्तीत जास्त दोन वर्षे जगण्याची शाश्वती दिली. योग्य उपचारासाठी हॉस्पिटलची सुविधा नव्हती, औषधोपचारांसाठी दोन गुंठे फ्लॅट विकला, त्यानंतर साडेआठ महिने झोपून राहिलो. तब्येतीत सुधारणा झाली नाही. जगण्याचा संघर्ष सुरू होता. एकदा तर दिवाळीला घरी फराळ दूर, भाकरीही खायला नव्हती. त्यानंतर कोल्हापूरला ऑपरेशन झाले, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. दिवस आणि परिस्थिती खालावत गेली. जगण्याची आशा सोडली होती आणि निराशेने मन भरून गेले होते. या साऱ्या नकारात्मक वातावरणात मला आशेचा किरण दिसला तो पुस्तकांचा. वडिलांना पुस्तकांची आवड होती. त्यात शिवरायांचेही चरित्र होते. एकापाठोपाठ पुस्तक वाचू लागलो.
मीही मनमोकळेपणाने लिहित गेलो. २००३ मध्ये मासिकासाठी 'सांगावा' नावाची ग्रामीण कथा लिहिली. ती कथा वाचून अनेक लोक भेटायला येक लागले, तिथून माझ्या खऱ्या जीवनाची सुरुवात झाली. आपण लिहितो आणि लोकांना ते आवडतं, यातून जगण्याचे बळ मिळाले. आता तीच माझी ऊर्जा आहे. अत्रापेक्षाही ती माझ्या शरीराची गरज आहे."
भवाळकर म्हणाल्या, "अपघातात दोन्ही पाय कायमचे गमावूनही न डगमगता आपल्या जिद्दीने वाचण्याची आस जिवंत ठेवली. पुस्तकांच्या सहवासातून वाचनसंस्कार रुजले आणि त्या प्रेरणेतून लेखनाचा जन्म झाला. वेदनांवर मात करीत त्यांनी नवा प्रवास सुरू केला. लेखनाचं-साहित्याचं मानवी जीवनातील मोल मांडणारा हा त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे." सावित्रीबाई फुले विद्यापीठ (पुणे) आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात त्यांच्या कथांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला माला आहे.
महेश कराडकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीनिवास जरंडीकर यांनी मानपत्रवाचन केले. प्रा. संजय ठिगळे यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या