प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांच्यासोबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.ही बैठक आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.शासनाने परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सक्ती केली असून,त्याचबरोबर परीक्षा कालावधीत संबंधित शाळेतील सर्व शिक्षकांना इतर शाळांमध्ये पाठविण्याचा निर्णयही जाहीर केला आहे.या दोन्ही निर्णयांचा सखोल विचार करता,त्याचा शाळा प्रशासन व अध्यापन प्रक्रियेवर होणाऱ्या परिणामांबाबत बैठकीत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
परीक्षांची पारदर्शकता,शिस्त व विश्वासार्हता वाढविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असल्याचे मान्य करताना,त्यासाठी लागणारी संपूर्ण आर्थिक तरतूद शाळांनी करणे सध्या तरी शक्य नसल्याची भूमिका मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने ठामपणे मांडण्यात आली.विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शाळांवर आर्थिक भार पडू नये,यासाठी सीसीटीव्ही बसविण्यासाठी शासनानेच स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा,अशी स्पष्ट मागणी करण्यात आली.
तसेच परीक्षा काळात सर्व शिक्षक एकाच वेळी दुसऱ्या शाळेत पाठविण्यात आल्यास,संबंधित शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.शाळांच्या दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असून,या प्रक्रियेसाठी अधिक व्यवहार्य,सुसूत्र व पारदर्शक धोरण राबविण्याची गरज असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.या बैठकीस मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर,उपाध्यक्ष सचिन नलावडे,कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राहुल पवार,बी.बी.पाटील,सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजयकुमार झांबरे,सचिव संतोष नाईक तसेच महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सर्व विभागांचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी उपस्थितांच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत,परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याबाबत शासनाच्या निदर्शनास बाबी आणून देण्याचे आश्वासन दिले. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, पारदर्शकता व विश्वास वाढविण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या