प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव नगरपरिषद हद्दीतील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील पात्र नागरिकांसाठी शासनाच्या रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घ्या असे आवाहन मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी केले आहे.यावेळी बोलताना मुख्याधिकारी म्हणाले की, या योजनेंतर्गत वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाखांपर्यंत असलेल्या आणि स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध असलेल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी राज्य शासनामार्फत रुपये 2.50 लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे.लाभार्थ्यांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर समाज कल्याण विभागामार्फत ते अर्ज जिल्हाधिकारी सांगली यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असून,मंजुरीनंतर नगरपरिषदेमार्फत पुढील कार्यवाही केली जाणार आहे.अर्जदारांनी विहित नमुन्यातील घरकुल मागणी अर्ज (फोटोसह) सादर करणे आवश्यक असून,त्यासोबत स्वतःच्या नावाचा 7/12 उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र,लाईट बील/पाणीपट्टी/घरपट्टी,जातीचा दाखला,चालू वर्षाचा उत्पन्न दाखला,आधार कार्ड,बँक पासबुक तसेच विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र व घराची सद्यस्थिती दर्शविणारा फोटो (अर्जदारासह) जोडणे बंधनकारक आहे.याशिवाय रेशन कार्ड,मतदान ओळखपत्र, तलाठी दाखला,नगरपरिषद मालमत्ता कर पावती आदी अतिरिक्त पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.अर्जाचा नमुना तासगाव नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध असून, कागदपत्रांची छाननी करून अर्ज पात्र ठरल्यास बांधकाम परवानगीसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.अधिक माहितीसाठी नागरिकांनी तासगाव नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या