प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील गट नं. 99 तसेच 41/अ व 41/ब या शेतजमिनींच्या मोजणीच्या नावाखाली पूर्वनियोजित कटातून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकरी तुकाराम हैबतराव पडवळ यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी भूमी अभिलेख विभागाकडे सविस्तर हरकतींसह लेखी अर्ज सादर केला आहे.
दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी झालेल्या चौथ्या मोजणीपूर्वीच 2 व 3 जानेवारी रोजी जेसीबीच्या सहाय्याने हद्दीचे दगड, झाडे व झुडपे काढून टाकून जमिनीची मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे ही कारवाई संबंधित खातेदारांच्या गैरहजेरीत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नोटीस न देता मोजणी – नियमांना हरताळ?
तक्रारीनुसार, मोजणीवेळी गट नं. 97, 92 (शासन जमीन), 41/अ, 41/ब, गट नं. 1, गट नं. 3 तसेच गावठाण हद्दीतील धारकांना कोणतीही नोटीस न देता जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले.
प्रत्यक्ष संबंध असलेल्या गटधारकांना वगळून केलेली मोजणी संशयास्पद असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रत्येक मोजणीत वेगवेगळे ‘अतिक्रमण’!
सन 1992, 1998, सहा महिन्यांपूर्वी व आता 2026 अशा चार वेळा मोजणी होऊनही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गटांवर अतिक्रमण दाखवण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रिया अविश्वसनीय ठरत असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.
फॉरेस्ट खात्याचा कब्जा झाकण्याचा प्रयत्न?
गट नं. 92 ही शासन जमीन असून फॉरेस्ट खात्याने गट नं. 99 मध्ये सुमारे 15 फूट आत खुणा करून कब्जा केल्याचा मुद्दा जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत आहे.
यामुळे कमी पडणारे क्षेत्र इतर शेतकऱ्यांच्या माथी अतिक्रमण म्हणून मारले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
एकत्रीकरणातील 34 गुंठ्यांचा घोळ
सन 1984 च्या एकत्रीकरण योजनेनुसार 5 एकर 34 गुंठे क्षेत्र असताना फक्त 5 एकरचा सातबारा तयार करण्यात आला, व उर्वरित 34 गुंठ्यांची दुरुस्ती आजतागायत न झाल्याने सध्याच्या मोजणीवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे अर्जात नमूद आहे.
76 वर्षांची वहिवाट दुर्लक्षित
सदर जमिनीवर 1950 पासून कुटुंबाची व 1980 पासून सलग, शांततापूर्ण वहिवाट असल्याचा दावा करत केवळ मोजणीच्या आधारे अतिक्रमण ठरवता येत नाही, हा सीमारेषा व क्षेत्रफळाचा वाद आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणावर आरोप?
या प्रकरणात सुगंध पोतदार (मालक) व विलास आंबेकर (मॅनेजर) यांच्यावर मोजणीचा गैरवापर करून अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निष्पक्ष अर्जाच्या मुद्द्यांच्या आधारे पुनर्मोजणीची मागणी
सर्व संबंधित गटधारक, शासन जमीन व फॉरेस्ट खाते यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत निष्पक्ष, पारदर्शक व कायदेशीर पुनर्मोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या