प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : प्रवाशांच्या सुविधेसाठी तसेच गाड्यांची माहिती देण्यासाठी एस.टी.च्या प्रत्येक आगारात चौकशी कक्षाचा अधिकृत संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे क्रमांक दर्शवण्यात आले आहेत. प्रत्यक्ष संपर्क केला असता सांगली जिल्ह्यातील विविध एस्. टी.आगारातील जाहीर करण्यात आलेले बहुतांश अधिकृत संपर्क क्रमांक बंद अथवा अकार्यक्षम रहातात. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हे सर्व क्रमांक तात्काळ चालू करण्यात यावेत, व ते सुरु असल्याची नियमित पडताळणी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ‘सुराज्य अभियान’च्या वतीने मिरज, विटा, ईश्वरपूर आणि पलूस येथील आगार व्यवस्थापकांना देण्यात आले. सांगली येथे विभागीय नियंत्रक श्री. सुनील भोकरे यांनाही निवेदन देण्यात आले. ‘या संदर्भात योग्य ती कार्यवाही करू’, असे आश्वासन सर्वांनी दिले.
काय आहेत सुराज्य अभियानाच्या मागण्या?
प्रवाशांच्या हितासाठी सर्व डेपोंनी २४ तास लँडलाईन आणि बॅकअप म्हणून मोबाईल क्रमांक कार्यान्वित ठेवावेत. या क्रमांकांची अद्ययावत यादी बस स्थानकांच्या फलकावर आणि वेबसाईटवर लावावी. तसेच, जाणीवपूर्वक कॉल न स्वीकारणार्या कर्मचार्यांवर कारवाई करून कॉल रेकॉर्डिंग यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी सुराज्य अभियानाने केली आहे.
या प्रसंगी ‘सुराज्य अभियान’चे सांगली जिल्हा समन्वयक श्री. राहुल कदम, तसेच सर्वश्री नारायण चौगुले, राज शिंदे, महेश शेट्टी, विठ्ठल मुगळखोड, भीमराव खोत, भरत जैन यांच्यासमवेत पलूस येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. सचिन जाधव, श्री. गणेश बुचडे, विटा येथील सिंह सेनेचे संस्थापक श्री. शिवभैय्या शिंदे, ईश्वरपूर येथील भारतीय किसान संघटनेचे श्री. अजित जाधव (अण्णा), श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. शेखर खांडेकर, हिंदु धर्मप्रेमी श्री. अभिमन्यू पाटील, युवा उद्योजक श्री. रत्नाकर पवार, पाटीदार समाजाचे श्री. किरीट पटेल, सनातन संस्थेचे श्री. सुरेश जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री. राहुल कदम, सुराज्य अभियानाकरिता
(संपर्क क्रमांक - 94046 96175)
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या