तासगाव : संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव येथे शिक्षणशास्त्र विभाग अधिष्ठाता सत्कार समारंभ,विद्यार्थी संसद उद्घाटन आणि राष्ट्रीय गणित दिन असा त्रिसूत्री कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे बापूजी साळुंखे, स्वामी विवेकानंद आणि महान गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी बी.एड.द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या गणित विषयावरील भित्तीपत्रिकेचे उद्घाटन केले.तसेच बी.एड.प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थींनी गणिताशी संबंधित शैक्षणिक साहित्य निर्मितीचे आकर्षक प्रदर्शन भरवले होते.या प्रदर्शनामध्ये गणितीय संकल्पना, सूत्रे,शैक्षणिक मॉडेल्स व उपक्रमाधारित साहित्य सादर करण्यात आले होते.गणित मंडळाचे उदघाटन पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.शिक्षणशास्त्र विभागाचे अधिष्ठाता म्हणून निवड झाल्याबद्दल मा. डॉ.अजय साळी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी माहेर अंक व स्नेहकुंज ही स्मृतिचिन्हे भेट म्हणून त्यांना प्रदान करण्यात आली.
यानंतर विद्यार्थी संसद शपथविधी घेण्यात आला.विद्यार्थी संसदेतील प्रत्येक सदस्याने कामाची जबाबदारी व प्रामाणिकतेची शपथ घेतली व दस्त स्वाक्षरी केली.प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सर्वांनाच नेमणूक पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.विद्यार्थी संसदेमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव,नेतृत्वगुण, निर्णयक्षमता,शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच प्राथमिक योग व बेसिक इंग्लिश ग्रामर या अभ्यासक्रमाचे प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.प्रशिक्षणार्थी मनोगत नलिनी निकम यांनी व्यक्त करून विद्यार्थी राष्ट्रीय गणित दिनाचे महत्व अधोरेखित केले.यावेळी प्रमुख पाहुणे मा.डॉ.अजय साळी यांनी आपल्या मनोगतात गणित विषयाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले.गणितीय कोडी, सूत्रे,खेळ व उपक्रमांच्या माध्यमातून गणित विषय विद्यार्थ्यांसाठी सोपा व आनंददायी कसा करता येईल, याबाबत त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.संसदेतील कामकाज, प्रतिनिधिचे नेतृत्व गुण,कर्तव्य इ. बाबींचेही आपल्या विशिष्ट्यपूर्ण शैलीतून मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बी.एम. पाटील यांनी आपल्या मनोगतात शिक्षणाचे बदलते स्वरूप, मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांची सामाजिक व नैतिक जबाबदारी यावर सखोल मार्गदर्शन केले.शिक्षक घडविताना मूल्यसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.बी.एम पाटील,डॉ लक्ष्मी भंडारे,विद्यार्थी संसद प्रमुख तथा गणित विभाग प्रमुख डॉ देवदत्त खजूरकर, डॉ.अर्चना चिखलीकर, प्रा.अंकुश पंडित उपस्थित होते तसेच प्रशासकीय सेवक संजय कुंभार हणमंत वाघमारे अस्मिता साळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.प्रमोद शेंडगे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षता शिगावकर यांनी केले तर सूत्रसंचालन सुमेधा सुतार व ऋषाली सूर्यवंशी यांनी केले,आभार स्वाती साळुंखे यांनी मानले.बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या