तासगाव:तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्किल डेव्हलपमेंट आणि औद्योगिकीकरणाच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात येत आहेत.हा भाग जिल्ह्यातील स्कील डेव्हलपमेंटचा केंद्रबिंदू बनविण्यासाठी देशभरातील नामांकित कंपन्यांशी थेट संवाद साधण्यात आला आहे,अशी माहिती तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित आर.आर.पाटील यांनी दिली.या प्रक्रियेत मतदारसंघामधील उपलब्ध मनुष्यबळ, भौगोलिक सोयी,पायाभूत सुविधा आणि पूरक वातावरण याबाबत सखोल चर्चा झाली असल्याचे आमदार रोहित पाटील यांनी सांगितले.आमदार रोहित पाटील म्हणाले, तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यांचा परिसर कृषीप्रधान असला तरी येथे उद्योगविकासासाठी आवश्यक असलेले अनेक घटक उपलब्ध आहेत.चांगले दळणवळण,रेल्वे व महामार्गांची जोड,सांगली जिल्ह्याचे मध्यवर्ती स्थान आणि मेहनती युवकांचा मोठा वर्ग ही या भागाची बलस्थाने आहेत.या सर्व बाबी लक्षात घेऊन स्किल डेव्हलपमेंट आणि एमआयडीसीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व्हावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.औद्योगिक विकास केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता ग्रामीण आणि निमशहरी भागातही पोहोचला पाहिजे. मतदारसंघात ती क्षमता नक्कीच आहे. उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांतील देशातील नामांकित कंपन्यांशी चर्चा सुरु आहे. उत्पादन उद्योग,अन्नप्रक्रिया उद्योग,लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग,टेक्स्टाईल,तसेच कौशल्याधारित सेवा क्षेत्रातील कंपन्यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. कंपन्यांच्या प्रतिनिधींना मतदारसंघातील संधी, उपलब्ध जमीन,पाणी व वीज सुविधा,स्थानिक प्रशासनाचे सहकार्य आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण याची सविस्तर माहिती दिली जात आहे.या संवादातून केवळ उद्योग आणणेच नव्हे,तर त्या उद्योगांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून देण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यावर भर देण्यात येत आहे.आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षण पुरेसे नसून कौशल्याधारित प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात युवकांसाठी आधुनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स उभारण्याचा मानस आहे.केंद्रांतून उद्योगांना आवश्यक असलेली कौशल्ये,तांत्रिक प्रशिक्षण, मशीन ऑपरेशन,गुणवत्ता नियंत्रण,आयटी आधारित कौशल्ये, तसेच सॉफ्ट स्किल्स यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
चौकट : स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होणार
आमदार रोहित पाटील म्हणाले, उद्योग आणि कौशल्य विकासामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे. थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती, पूरक व्यवसायांची वाढ, सेवा क्षेत्राचा विस्तार, स्थानिक उद्योजकांना नवीन संधी मिळणार आहेत. याचा सकारात्मक परिणाम शेतीपूरक व्यवसाय, वाहतूक, निवास व्यवस्था आणि बाजारपेठांवरही होणार आहे.
चौकट : तरुणाईला नवी दिशा मिळणार
तासगाव–कवठेमहांकाळ मतदारसंघातील तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा आणि क्षमता आहे. योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास हीच तरुणाई विकासाची मुख्य ताकद ठरू शकते.स्किल डेव्हलपमेंट आणि औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या गावातच उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी मिळावी, हा या संपूर्ण प्रयत्नांचा केंद्रबिंदू आहे.यातून मतदारसंघातील तरुणाईला नवी दिशा मिळणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या