प्रतिष्ठा न्यूज
गगनबावडा प्रतिनिधी : कोविडनंतर नागरिकांना जाणवणाऱ्या दीर्घकालीन आरोग्यसमस्यांचा अभ्यास करून आवश्यक वैद्यकीय तपासणी, उपचार सुविधा आणि व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी सांगशी (ता. गगनबावडा) येथील तुकाराम हैबती पडवळ यांनी राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दैनिक पुण्यनगरीच्या कोल्हापूर आवृत्तीमध्ये १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पान क्रमांक दोनवर प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा संदर्भ देत पडवळ यांनी ही विनंतीवजा तक्रार केली आहे. कोविडनंतर काही रुग्णांना मेंदूतील रक्तप्रवाह कमी होणे, तीव्र थकवा जाणवणे आणि एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्या उद्भवत असल्याचे संबंधित वृत्तात नमूद करण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
कोरोना महामारीचा काळ संपला असला, तरी त्यानंतर जाणवणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करता कामा नये. अशा समस्यांमुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या आरोग्यसमस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सरकारी रुग्णालयांत तपासणी व उपचार सुविधा द्या
कोविडनंतर उद्भवणाऱ्या दीर्घकालीन आरोग्यसमस्यांचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. सरकारी रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तीव्र थकवा, एकाग्रतेचा अभाव तसेच अन्य त्रास जाणवणाऱ्या नागरिकांसाठी जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याशिवाय, कोविडनंतरच्या आरोग्यसमस्यांबाबत आरोग्य विभागाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांची माहिती जनतेला द्यावी आणि या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही पडवळ यांनी केली आहे.
नागरिकांचे आरोग्य ही शासनाची महत्त्वाची जबाबदारी असून, संभाव्य आरोग्यसमस्यांचे वेळेत निदान होऊन रुग्णांना योग्य वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेऊन संबंधित यंत्रणेमार्फत योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा तुकाराम हैबती पडवळ यांनी व्यक्त केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या