हातनूर प्रतिनिधी : तासगाव तालुक्याचा दुष्काळी प्रश्न अद्याप प्रशासकीय प्रक्रियेत असून, शासनाने सर्वेक्षणासाठी जाहीर केलेल्या १९ तालुक्यांच्या यादीत तासगावचा समावेश नसल्याने तासगावला दुष्काळी उपाययोजनांपासून वंचित ठेवण्यात आले आहे, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी सांगितले.
राज्य शासनाने दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त अन्य १९ तालुक्यांमध्ये परिस्थितीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने डोंगराळ तसेच भौगोलिकदृष्ट्या विशेष परिस्थिती असलेल्या भागांचा समावेश आहे. अशा भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, टँकरची आवश्यकता आणि जलस्रोतांची स्थिती यांचे मूल्यमापन करण्यासाठी स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र, या १९ तालुक्यांच्या यादीत तासगाव तालुक्याचा समावेश नसल्यावरून “तासगावला पुन्हा वंचित ठेवले” किंवा तासगावचा दुष्काळी उपाययोजनांमध्ये समावेश होणार नाही, असा निष्कर्ष काढणे प्रशासकीयदृष्ट्या योग्य ठरणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
तासगाव तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा विषय स्वतंत्र प्रशासकीय प्रक्रियेत आहे. आमदार रोहित पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाला पीक कापणी अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार तासगाव तालुक्यात पीक कापणी अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीक कापणी प्रयोगातून प्रत्यक्ष उत्पादनाची वस्तुनिष्ठ नोंद घेतली जाते. दुष्काळसदृश परिस्थिती तसेच पीक नुकसानीबाबत पुढील निर्णय प्रक्रियेत या अहवालाला महत्त्व असते.
त्यामुळे १९ तालुक्यांच्या सर्वेक्षणाचा आदेश आणि तासगाव तालुक्यात सुरू असलेली पीक कापणी अहवालाची प्रक्रिया या दोन स्वतंत्र बाबी आहेत. एका यादीत तासगावचे नाव नसल्यामुळे तासगावचा दुष्काळी प्रश्न संपला, असे मानणे योग्य नाही, असेही सचिन पाटील यांनी सांगितले.
पीक कापणी अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर तासगाव तालुक्यातील प्रत्यक्ष पीकस्थिती, उत्पादनातील घट, पर्जन्यमानातील तफावत आणि दुष्काळसदृश परिस्थिती यांचा शासनस्तरावर विचार होऊन पुढील निर्णय होऊ शकतो. त्यामुळे सध्या समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या चर्चेकडे भावनिक किंवा राजकीय दृष्टीने पाहण्यापेक्षा प्रशासकीय प्रक्रियेचा पुढील टप्पा काय आहे, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
तासगावचा दुष्काळी प्रश्न अद्याप निर्णयाच्या प्रक्रियेत असून, पीक कापणी अहवाल हा त्यातील महत्त्वाचा आधार ठरणार आहे. त्यामुळे १९ तालुक्यांच्या यादीत तासगावचे नाव नसणे म्हणजे तासगावला दुष्काळी उपाययोजनांपासून वंचित ठेवण्याचा अंतिम निर्णय झाला आहे, असा अर्थ काढणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही, असे सचिन पाटील यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या