प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तातडीने समावेश करून शेतकऱ्यांना शासनस्तरावरून मदत द्यावी, या मागणीसाठी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा विकास आघाडीच्या वतीने सांगलीतील स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर गांधीगिरी पद्धतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना काही तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने तातडीने संपूर्ण जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करावा; अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संजयकाका पाटील यांनी दिला.
यावेळी बोलताना संजयकाका पाटील म्हणाले, “संपूर्ण सांगली जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून दुष्काळग्रस्तांसाठीच्या सर्व योजना लागू करा. पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. माणसांना जगणे आणि जनावरांना वाचवणेही मुश्किल झाले आहे. सरकारने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा.”
जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये नद्या, तलाव, बंधारे आणि पाणवठ्यांची पाणीपातळी खालावली असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात पिण्याचे पाणी आणि शेतीच्या सिंचनाचे नियोजन अधिक आव्हानात्मक होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे केवळ कागदावरील निकष न पाहता प्रत्यक्ष शेतशिवाराची पाहणी करून दुष्काळाची तीव्रता निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली.
तासगाव, खानापूर, पलूस, कडेगाव, वाळवा, शिराळ्याचा समावेश करण्याची मागणी
सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या पहिल्या यादीत तत्काळ समावेश करून त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली. विशेषतः तासगाव, खानापूर, पलूस, कडेगाव, वाळवा आणि शिराळा या तालुक्यांमध्ये अत्यल्प पावसाची नोंद झाली असतानाही त्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आलेला नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
कोयनेचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याची मागणी
सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोयना धरणातील जलविद्युत प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी उपयोग करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनानुसार, कोयना धरणातील एकूण १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाणारे सुमारे ६७.५० टीएमसी पाणी कोकणातून अरबी समुद्राकडे जाते. सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या पाण्याचा दुष्काळी भागासाठी योग्य पद्धतीने वापर करण्याची मागणी करण्यात आली.
जलविद्युत निर्मितीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून राज्यातील सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली.
हेक्टरी ५० हजार ते एक लाखांची मदत द्या
सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेतीची सरसकट प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल तातडीने तयार करावा. बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार ते एक लाख रुपये मदत द्यावी तसेच पिकांच्या नुकसानीसाठी स्वतंत्र शासन निर्णय काढून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
टँकर, चारा छावण्या आणि १२ तास वीजपुरवठ्याची मागणी
दुष्काळग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन मागणीनुसार टँकर सुरू करावेत. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात. तलाव, लघु पाटबंधारे तलाव, बंधारे आणि नदीपात्रातील पाणी उपशावर बंदी घालू नये, अशीही मागणी करण्यात आली.
शेती आणि घरगुती वीजपुरवठ्यात लोडशेडिंग करू नये तसेच कृषी पंपांना दिवसा किमान १२ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली.
कर्जवसुली थांबवा; पीकविमा वेळेत द्या
दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीकर्जाची वसुली थांबवावी आणि सर्व शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ वेळेत मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसंधारण आणि कृषीपूरक कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करून एकाचवेळी दुष्काळ निवारण आणि रोजगारनिर्मिती करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तसेच शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणीही करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या संतप्त भावना
आंदोलनादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या. पाणी, शेती, जनावरे, वीज, कर्ज आणि पीकनुकसान या प्रश्नांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत सापडला असून शासनाने तातडीने प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते प्रभाकर पाटील, पंचायत समिती सभापती सौ. अरूणा महेश पाटील, पंचायत समिती सदस्य महेश पाटील, सुखदेव भिमराव पाटील, दिग्विजय पाटील, नितीन पाटील, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत जमदाडे, सुनील जाधव, प्रमोद शिवाजी सेंडगे, अजयकुमार शिवाजी पाटील, संदीप पाटील, अमित पवार, संतोष पांडुरंग बेले, संजय संपत लुगगडे, किरण दिलीप पाटील, विजयराव साळुंखे, माणिकराव मारुती जाधव, महावीर विलास सागरे, योगेश अशोक जाधव, सुरेंद्र शामराव वाळवेकर, चुनिक जयपाल फराटे, वसंत भाऊ चव्हाण, पवनकुमार बाळासाहेब शिंदे, नामदेव चोपर पाटील, अजित बाबासाहेब माने, नितीन मोहन नवले, सचिन शिवाजी शिंदे, उमेश आनंदा गावडे, अजय राजेंद्र धाबुगडे, नारायण रामचंद्र शिंदे, विशाल जमदार, रविंद्र भोसले, कृष्णा पवार, अनिल पवार, विनायक धोत्रे, संजय सदाशिव लुगडे, राजेंद्र बापू शिंदे, नगरसेवक सतीश किसन लिंबळे, विकास सुधाकर शेंडगे, निलेश अशोक रोकडे, अतुल अशोक पवार, निवास कांबळे, मधुकर पाटील, सागर बाळासो हाके, प्रदीप प्रकाश पाटील, प्रविण पाटील, माणिक शिवाजी शिंदे, बाबुराव शिवाजी शिंदे, गोविंद सदाशिव जाधव, समर्थ शिंत्रे, वेदांत हिम्मत देसाई, ओंकार सुनील देसाई, संतोष गणपती पाटील, प्रशांत वसंत पाटील, बालाजी रावसाहेब पारीट, नवनाथ तुकाराम गवळी, चंद्रकांत गवळी, अमर पाटील, सागर मालती पांढरे, सचिन बनन माळी, जाफर भाई मुजावर, सुशांत नंदकुमार पैलवान, रोहित पांडुरंग ढोले, विशाल माळी यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
“सांगली जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; अन्यथा आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र असेल,” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या